सिंधुदुर्गातील ९४ टक्के सरकारी कार्यालयांत बसविण्याचे काम पूर्ण..
⚡ओरोस, ता. १३-: वीज वापराची तासागणिक माहिती मोबाईलवर उपलब्ध होणे, अचूक बिलिंग, वीज बचतीला चालना आणि शॉर्टसर्किटसारख्या प्रसंगी आपोआप वीजपुरवठा खंडित करून सुरक्षितता वाढविणे, अशा अनेक सुविधांमुळे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार ३५२ सरकारी कार्यालयांपैकी ७ हजार ८५३ कार्यालयांमध्ये (९३.७९ टक्के) स्मार्ट मीटर बसविण्यात आले असून जिल्ह्यातील चार लाख ग्राहकांपैकी एक लाख ग्राहकांकडेही स्मार्ट मीटरची स्थापना पूर्ण झाली आहे, अशी माहिती महावितरणचे जिल्हा जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुडाळ महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमारे उपस्थित होते.
भोसले म्हणाले, स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅमेरा नसून ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग होत नाही. या मीटरमध्ये केवळ वीज वापराची डिजिटल नोंद केली जाते. त्यामुळे वापरलेल्या विजेचे अचूक बिल तयार होते आणि मानवी चुकीची शक्यता कमी होते. प्रत्येक तासाचा वीज वापर मोबाईलवर पाहता येत असल्याने ग्राहकांना वीज वापरावर नियंत्रण ठेवून बचत करणे शक्य होते.
घरगुती ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर प्रतियुनिट ८५ पैशांची सवलत दिली जात आहे. तसेच घरामध्ये शॉर्टसर्किट किंवा अन्य तांत्रिक बिघाड झाल्यास स्मार्ट मीटर आपोआप वीजपुरवठा बंद करतो. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यास मदत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटरबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, १ जून ते १३ जुलै २०२६ या कालावधीत वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. या काळात १०२ विद्युत खांब निकामी झाले असून त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. ११ केव्ही उच्चदाब वाहिनीचे ३९७ खांब कोसळले होते. त्यापैकी ३७७ खांब पुन्हा उभारण्यात आले असून उर्वरित २० खांबांचे काम सुरू आहे. त्या भागातील ग्राहकांना पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे.
लघुदाब वीजवाहिनीचे ८९९ खांब पडले होते. त्यापैकी ८०३ खांब पुन्हा उभारण्यात आले असून उर्वरित खांब उभारण्याचे काम सुरू आहे. या नैसर्गिक आपत्तीत महावितरणचे सुमारे १ कोटी ३९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहितीही भोसले यांनी दिली.
