Headlines

सिंधुदुर्ग राज्यात अव्वल; प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत शंभर टक्के नोंदणी पूर्ण

ओरोस, ता. १३ :
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शंभर टक्के लाभार्थी नोंदणीचे उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण केले आहे. गर्भवती व स्तनदा महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याला ही कामगिरी साध्य करता आली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नारकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक उगारे, जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, मनोज रावराणे आदी उपस्थित होते.
कामत म्हणाले, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून महाराष्ट्रात ८ डिसेंबर २०१७ पासून तिची अंमलबजावणी सुरू आहे. गर्भवती व स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारणे, माता व बालमृत्यूदर कमी करणे तसेच गर्भधारणेदरम्यान सकस आहारासाठी आर्थिक प्रोत्साहन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेत केंद्र शासनाचा ६० टक्के आणि राज्य शासनाचा ४० टक्के आर्थिक सहभाग आहे. पात्र महिलांना पहिल्या जिवंत अपत्यासाठी ५ हजार रुपये आणि दुसऱ्या जिवंत मुलीसाठी ६ हजार रुपये अशी आर्थिक मदत थेट लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक किंवा पोस्ट खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते.
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५४१ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित केले होते. या उद्दिष्टाची १०० टक्के पूर्तता करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे. १५ जुलै २०२६ ही अंतिम मुदत असताना जिल्ह्याने ११ जुलै २०२६ रोजीच पात्र ५७२ एवढ्या लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण करीत १०४ टक्के काम केले असल्याचे कामत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page