जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:त्रुटी आढळल्यास ठेकेदारावर कारवाई..
सावंतवाडी : शहरातील 57 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे कामात तांत्रिक अडचणी आहेत. तसेच ठेकेदार व प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. दुसरीकडे, या कामाचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात आले असून त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हा रिपोर्ट नगरपरिषदेच्या सभेत सादर केला जाणार असून त्यावर ते निर्णय घेणार आहेत. जिल्हाधिकारी म्हणून या योजनेवर आमचंही लक्ष राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार आज त्यांनी सावंतवाडीत नगरपरिषदेत भेट देत बैठक घेतली. यानंतर त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, या ऑडिटमध्ये करारानुसार काम न झाल्याचे निष्पन्न झाले तर संबंधितांवर कारवाई केली जाईल. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी याबाबतचे मुद्दे उपस्थित केले असून सुचना दिलेल्या आहेत. स्थळ पाहणी देखील आज करण्यात आली असून काही तांत्रिक अडचणी असल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले. या योजनेचे आपल्याला गांभीर्य असून या योजनेच्या कामावर आपण शेवटपर्यंत लक्ष देणार आहोत. आजच्या पाहणी दरम्यान स्थानिक नगरसेवक, नागरिकांनी सुद्धा अनेक तुटीवर बोट ठेवले. एकूणच, यातून प्रशासन, ठेकेदार व नागरिक यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला. मुळात ज्यागतीने हे काम झाले पाहिजे होते ते झाले नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींवर आज येथील सभागृहात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्यात आले असते तरी या संपूर्ण कामाचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात आले आहे. हे ऑडिट प्रशासनाकडे प्राप्त झाले असून लवकरच ते नगरपालिकेच्या कॉन्सिलसमोर ठेवण्यात येणार आहे. ऑडिटमध्ये झालेल्या करारानुसार काम दिसून न आल्यास तसेच कामांमध्ये त्रुटी आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचे सर्वस्वी अधिकार हे नगरपालिकेकडे आहेत. दुसरीकडे, या योजनेच्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी यासाठी आपण नगरसेवक, नागरिक, सामाजिक कार्यकर्त्यांचेही म्हणणे ऐकून घेणार आहे. प्रशासकीय काळामध्ये ज्या चुका या कामांमध्ये झाल्या त्याची चौकशी लावून त्यामध्ये चुका आढळल्यास शंभर टक्के संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, आज पार पडलेल्या बैठकीमध्ये शहरातील नागरिकांना नळपाणी योजना संदर्भात गैरसोयी होऊ उद्भवू नये यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आली. साधारणतः एका वर्षात ही योजना पूर्णत्वास येण्यास कालावधी लागणार आहे. हे काम करत असताना कराराप्रमाणे काम केले गेले की नाही ? याबाबत चौकशी केली जाणार आहे. हॉट मिक्स ऐवजी कोल्ड मिक्सने काम झाल्याचे म्हणणे उपनगराध्यक्षांचे आहे. त्यामुळे बील अदा करताना कोणत्या प्रकारे झालं ते देखील तपासावे लागेल. तसेच इतर तांत्रिक गोष्टींचा विचार करून यापुढे होणाऱ्या कामावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. मुळात ही योजना गुरूत्वाकर्षणावर चालणारी योजना असल्याने शंभर टक्के पाणीपुरवठा त्यावरच केला जाईल, लोकांना गैरसोय होऊ नये यासाठी विशेष लक्ष यापुढे ठेवण्यात येणार आहेत. दुसरीकडे, शहरात होणाऱ्या योगा सेंटरच्या कामाच्या भागातून जाणारी नरेंद्र डोंगरावरील नळपणी योजनेची पाईपलाईन दुसऱ्या मार्गाने हलवण्यासाठी वेगळे पैसे देण्यात येणार आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. तर सावंतवाडी विधानसभे झाडे पडून लाईन तुटल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर आंबोलीमध्ये शनिवार व रविवार होणारी गर्दी आणि त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी हा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी पर्यटकांना विशेष वाहनातून धबधब्याच्या परिसरात सोडण्यासाठी व्यवस्था केली जाईल, त्यासाठी वन विभागाला अजून गाड्यांची उपलब्धता करून दिली जाईल. तसेच या दोन्ही दिवसांमध्ये जास्तीत जास्त पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी केली जाणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आदी उपस्थित होते.
