Headlines

५७ कोटींच्या नळपाणी योजनेवर ठेकेदाराची चिरफाड…

निकृष्ट काम, समन्वयाचा अभाव आणि २८ कोटींच्या देयकांवर नगरसेवकांचा संताप; ‘थर्ड पार्टी ऑडिट’ अहवाल विशेष सभेत मांडण्याचे निर्देश..

⚡सावंतवाडी ता.१४-: नगरपालिकेच्या ५७ कोटींच्या नळपाणी योजनेच्या कामात ठेकेदाराकडून झालेली दिरंगाई, निकृष्ट दर्जा आणि समन्वयाचा अभाव यावरून उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांसह सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी संताप व्यक्त करत ठेकेदाराच्या कामाची चिरफाड केली. पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतलेल्या ऑनलाईन बैठकीनंतर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवारी थेट सावंतवाडी नगरपालिकेत भेट देऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपली नाराजी जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित ठेकेदाराला चांगलेच धारेवर धरले.

या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धाराजे सावंत-भोसले यांच्यासह पालिकेचे नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी नळपाणी योजनेच्या कामाचा जणू पाढाच वाचला. ठेकेदाराने करारनाम्यातील अटींची पूर्तता केलेली नाही. तरीही त्यांना २८ कोटी रुपये कशाच्या आधारे अदा करण्यात आले ? प्रभारी नगराध्यक्ष असताना मी आक्षेप घेतलेला असतानाही ११ कोटींच बील नंतरच्या काळात अदा झाल. शहरात ‘हॉट मिक्स’ऐवजी ‘कोल्ड मिक्स’ वापरून रस्ते बुजवण्यात आलेत. ठेकेदाराचे ऑफिस फक्त नावापुरतेच आहे. कामाचे व्हिडिओ शूटिंगही दाखवण्यात आलेले नाही, उच्चविद्याविभूषित अभियंता कार्यालयात नाही, फॉरेन्सिक लॅब नाही, असा घणाघात त्यांनी केला. ढिसाळ कामामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून जनतेच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच काम सुरू झाल्यापासून कामाचे व्हिडिओ दैनंदिन न.प.ला द्यायचे आहेत. मुव्हमेंट रजिस्टर आवश्यक आहे. मात्र, यात शंका निर्माण झाल्याने ३० मार्च २०२६ रोजी मुख्याधिकारी यांनी ठेकेदाराला पत्र देत कामाला स्थगिती दिली. यावेळी ‘थर्ड पार्टी ऑडिट’ रिपोर्ट दक्षता व गुणनियंत्रण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागवला होता‌. त्यानंतर पुढे काम सुरू करण्यास सांगितले होते. ११ नगरसेवकांच्या सह्या देखील त्यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अद्याप हा रिपोर्ट आपल्याकडे आला नसल्याचे सांगितले. तर ठेकेदाराला मुदतवाढ देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकारी यांना केली.

सत्ताधारी, विरोधी नगरसेवकांकडून ठेकेदार धारेवर
दरम्यान, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी देखील आपण ठेकेदाराकडून चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या कामाबाबत लक्ष वेधले होते असा मुद्दा मांडला. सभापती दिपाली भालेकर, सभापती आनंद नेवगी, सभापती मोहिनी मडगावकर, विरोधी पक्षाचे गटनेते बाबू कुडतरकर, काँग्रेसचे तौकीर शेख आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देवेंद्र टेमकर यां नगरसेवकांनी कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल ठेकेदाराला धारेवर धरले.

यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी या योजनेच्या कामात संबंधितांकडून काही चुका झाल्याचे सांगत समन्वय साधून काम उत्तम रीतीने करण्याचे निर्देश दिले. ही योजना पुढे घ्यायची आहे त्यामुळे पुढील कामे उत्तमरीत्या करा आणि समन्वय साधून कामे करा असे स्पष्ट केले. तर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पाईपलाईनच्या खोदाई कामाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर बैठकीत ठेकेदार, इंजिनिअर आणि पालिका प्रशासन यांच्यात कोणताही समन्वय नसल्याचे स्पष्ट केले. २८ कोटी अदा केलेत, पैसे वेळेवर दिलेत. मग, कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण का नाहीत ? लोकप्रतिनिधी आणि जनता तुमच्या कामावर नाराज आहेत. उर्वरित कामे करारनाम्यातील अटी व शर्तींनुसारच झाली पाहिजेत, अशा कडक सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच, मे महिन्यात प्राप्त झालेला या कामाचा ‘थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट’ पालिकेच्या विशेष बैठकीत मांडून सर्वांना त्याची सविस्तर कल्पना द्यावी, असे निर्देशही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले.

You cannot copy content of this page