Headlines

गरजू विद्यार्थ्यांप्रती सामाजिक बांधिलकी जपत श्री शिवशंभू ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

सावंतवाडी : सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाची जपणूक करत विविध विधायक उपक्रम राबविणाऱ्या मळगाव येथील श्री शिवशंभू ग्रुपने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. उत्सव साजरे करण्याबरोबरच समाजातील गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा जपत मंडळाने रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून कौतुकास्पद उपक्रम राबविला.
श्री शिवशंभू ग्रुपच्या माध्यमातून मळगाव येथे विविध सामाजिक, ऐतिहासिक व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात. गेल्या वर्षापासून मंडळाच्यावतीने छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती उत्सव सुरू करण्यात आला असून, बलिदान मास, शिवराजाभिषेक सोहळा, दुर्गामाता दौड आदी कार्यक्रमांचे आयोजनही नियमितपणे केले जाते. याशिवाय मळगाव व परिसरातील शाळांमध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आणि इतिहासाची माहिती देणारे विशेष उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी अभिमान व प्रेरणा जागविण्याचे कार्यही मंडळ करत आहे.
यावर्षी छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती व शिवराजाभिषेक सोहळ्याचे कार्यक्रम पावसामुळे मर्यादित स्वरूपात घेण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमासाठी जमा झालेल्या निधीपैकी अर्धी रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी वापरण्याचा निर्णय मंडळाने घेतला. त्यानुसार रोणापाल येथील दयासागर छात्रालयातील ४० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या शैक्षणिक साहित्यात वही, पेन, पेन्सिल, खोडरबर आदी वस्तूंचा समावेश होता. यावेळी मंडळाचे खजिनदार तथा सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गरक्षक सुनील राऊळ, उपाध्यक्ष प्रथमेश राणे, ज्ञानेश्वर राणे, अश्विन गाड, संदीप राऊळ, पत्रकार मदन मुरकर, जिवबा वीर आदी उपस्थित होते. सुनील राऊळ व ज्ञानेश्वर राणे यांनी मुलांना गड किल्ल्याबाबत माहिती दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना व आभार प्रदर्शन जिवबा वीर यांनी केले.

You cannot copy content of this page