मंत्री उदय सामंत:आडाळी उत्खननातील दोषींवर गुन्हे दाखल करणार..
⚡सावंतवाडी,ता.१३-: स्थानिक जनतेचा विरोध लक्षात घेता आजगाव-धाकोरे येथील मायनिंग प्रकल्पाला आमचाही पूर्ण विरोध राहील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.
याचवेळी सावंतवाडीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी आडाळी एमआयडीसी येथील चुकीच्या उत्खनन प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणाची सध्या राज्याच्या सचिव स्तरावर सखोल चौकशी सुरू असून, यामध्ये उद्योग विभागाचा कोणताही अधिकारी दोषी आढळल्यास त्याला थेट सेवेतून निलंबित केले जाईल, असा सज्जड दम त्यांनी दिला.
आडाळी येथील प्रकार अत्यंत गंभीर आणि चुकीचा असून, चौकशी अहवाल हाती आल्यानंतर संबंधित दोषींवर केवळ प्रशासकीय कारवाई करून सोडले जाणार नाही, तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला अॅड. स्वप्नील प्रभूआजगावकर देखील उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री सामंत यांनी आडाळी एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर नवनवीन उद्योग आणण्यासाठी शासनाचा सुरू असलेला कृती आराखडा जाहीर केला. या भागाचा औद्योगिक विकास जलद गतीने व्हावा यासाठी लवकरच गोव्यात एक विशेष बैठक घेतली जाणार असून, यामध्ये देशातील आणि परदेशातील विविध नामांकित कंपन्यांना निमंत्रित केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.यासोबतच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती दिली. जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवाला आणि अस्मितेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्गात लवकरच भव्य ‘मालवणी भवन’ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक तरुणांना काळाच्या गरजेनुसार रोजगाराभिमुख बनवण्यासाठी जिल्ह्यात ‘स्कील डेव्हलपमेंट’ अर्थात कौशल्य विकास कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून येत्या काळात अनेक कुशल आणि तंत्रस्नेही विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हा प्रामुख्याने पर्यटन आणि पर्यटनावर आधारित उद्योगांच्या माध्यमातूनच व्हावा यासाठी आपले विशेष प्रयत्न राहतील, अशी ग्वाहीही मंत्री उदय सामंत यांनी शेवटी दिली.
