भातलावणीचा घेतला प्रत्यक्ष आनंद
कणकवली : शेतीविषयी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी, आधुनिक शेतीची माहिती मिळावी आणि कृषी संस्कृतीची ओळख व्हावी या उद्देशाने श्री स्वयंभू विद्यामंदिर, कणकवली शाळा क्रमांक २ च्या विद्यार्थ्यांसाठी “वनराई सारथे” उपक्रमांतर्गत बांधावरच शाळा भरविण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतात उतरून भातलावणीचा आनंद घेतला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना भात शेतीची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तरवा काढणे, चिखल तयार करणे, भाताची लावणी करणे, पिकांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी, तसेच शेतीतील आधुनिक अवजारे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शेतकऱ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांनी विविध कृषी कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल जिज्ञासा निर्माण झाली असून, शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीवही त्यांना झाली. पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक समृद्ध कशी करता येते, याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता सावंत, शिक्षिका सौ. वंदना राणे, सौ. रूपाली चव्हाण, सौ. संचिता परब, सौ. ज्योत्स्ना गावडे तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हा उपक्रम संस्मरणीय ठरविला.
