आंबोली ते मांगेली सह्याद्रीपट्टा इको सेन्सिटिव्ह जाहीर होणे हीच माधव गाडगीळ यांना खरी श्रद्धांजली…

डॉ.जयेंद्र परुळेकर: महादेव गाडगीळ यांच्या निधनामुळे निसर्ग संवर्धन चळवळीचे मोठे नुकसान झाले..

सावंतवाडी : ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ व पश्चिम घाट पर्यावरण तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष डॉ. माधव गाडगीळ यांचे दुःखद निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली ते मांगेली या दोन तालुक्यांतील सह्याद्रीपट्टा आगामी काळात इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर होणे, हीच डॉ. माधव गाडगीळ यांच्या स्मृतींना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात जयेंद्र परुळेकर, स्टॅलिन दयानंद व संदीप सावंत यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

ते म्हणाले की, सहा राज्यांतून पसरलेल्या पश्चिम घाटाचे, म्हणजेच आपल्या सह्याद्री पर्वतरांगांचे संरक्षण व संवर्धन व्हावे यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांनी आयुष्यभर सातत्याने प्रयत्न केले. कोकणासह संपूर्ण पश्चिम घाट परिसरात वृक्षतोड होऊ नये, मायनिंगसारखे तसेच प्रदूषणकारी प्रकल्प रोखले जावेत आणि पर्यावरणपूरक हरित प्रकल्पांना प्राधान्य मिळावे, यासाठी ते ठामपणे आग्रही होते.
पश्चिम घाटातील जैवविविधता, समृद्ध निसर्गसंपदा व वनसंपत्तीचे रक्षण करणारे म्हणून डॉ. माधव गाडगीळ यांचे कार्य अतुलनीय आहे. पश्चिम घाटावरील त्यांचा अहवाल हा येथील निसर्ग संरक्षण व संवर्धनासाठी वेद-उपनिषदांइतकाच मार्गदर्शक ठरावा, असा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यांच्या निधनामुळे निसर्ग संवर्धन चळवळीचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे विचार व मार्गदर्शन आगामी काळात पश्चिम घाटातील निसर्ग व वन्यजीव संरक्षणासाठी नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

You cannot copy content of this page