⚡दोड़ामार्ग ता.०८-: आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय विभागामार्फत वाचन संकल्प महाराष्ट्राचा या कार्यक्रमाअंतर्गत लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लेखक व विचारवंत प्रा. डॉ.प्रल्हाद गाथाडे उपस्थित होते.
या वेळी प्रा. डॉ. प्रल्हाद गाथाडे यांनी आपल्या साहित्यिक प्रवासाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.वाचन,लेखन आणि समाजभान याचे महत्त्व विषद करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्याची गरज अधोरेखित केली.विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. डॉ. प्रल्हाद गाथाडे यांनी साहित्य,समाज आणि व्यक्तीघडण यांचा परस्परसंबंध उलगडून सांगितला.वाचनातून विचारशक्ती विकसित होते,तर लेखनातून व्यक्तिमत्व घडते.विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता साहित्याशी मैत्री करावी असे आवाहन त्यांनी केले.आपल्या साहित्यिक वाटचालीतील अनुभव कथन करत त्यांनी तरुण पिढीला लेखनाकडे वळण्याची प्रेरणा दिली.लेखक आणि वाचक यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा,या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे आयक्यूसी प्रमुख प्रा. ए.बी. ढेंगे उपस्थित होते .त्यांनी आपल्या मनोगतामध्ये लेखक आपल्या भेटीला या सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक दृष्टी आणि सामाजिक जाणीव विकसित होते.असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुदीप नाईक सर तर आभार ग्रंथपाल बी. व्हि. राशिवडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यां,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आमदार दीपकभाई केसरकर विज्ञान महाविद्यालयात लेखक आपल्या भेटीला उपक्रम साजरा…
