शिवसेना (उबाठा) गटाला धक्का:ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश..
⚡कणकवली ता.०७-:
नरडवे गावाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला आहे. नरडवे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य दिपाली दिनकर कदम व बुद्धदास तातू कदम यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. जि.प. माजी अध्यक्ष संदेश (गोट्या) सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर, संघटनात्मक ताकदीवर तसेच केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांवर विश्वास ठेवून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे नवप्रवेशित सदस्यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रवेशामुळे नरडवे गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, शिवसेना (उबाठा) गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रवेशावेळी बोलताना संदेश (गोट्या) सावंत यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकला. भाजप हा केवळ सत्तेसाठी नव्हे, तर विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत विविध योजना पोहोचवण्याचे काम भाजपने प्रभावीपणे केले आहे. याच विकासकामांमुळे आज अनेक लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
नवप्रवेशित सदस्य दिपाली दिनकर कदम व बुद्धदास तातू कदम यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी भाजप हेच योग्य व्यासपीठ आहे. कोणत्याही दबावाशिवाय, पूर्णपणे स्वेच्छेने आणि विकासाच्या भूमिकेतून आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास नरडवे गावचे सरपंच शगणपत सावंत, मा. जि. प. सदस्य सुरेश ढवळ, माजी उपसरपंच वैभव नार्वेकर, विद्यमान उपसरपंच विनोद बागवे, माजी सरपंच अमिता सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष बाळा गुरुजी, माजी ग्रामपंचायत सदस्य सदानंद सावंत, शंकर सावंत, भाई सावंत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अपर्णा सावंत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवप्रवेशित सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे नरडवे गावात भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप अधिक प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना (उबाठा) गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून, भविष्यात आणखी प्रवेश होण्याची शक्य देखील वर्तवली जात आहे.
