वायरी भूतनाथ येथील किनाऱ्यालगतच्या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य…

जय भूतनाथ पर्यटन संस्थेकडून उपोषणाचा इशारा..

⚡मालवण ता.०७-:
वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी उभाटावाडी येथे समुद्र किनारी असलेल्या रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायततीने कचराकुंडी ठेवली असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला कचरा रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरून दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे गावातील लोकांना तसेच पर्यटकांना त्रास सहन करावा लागत असून याबाबत ग्रामपंचायतीकडून योग्य ती उपाययोजना न झाल्यास दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. सदर रस्त्यावरच जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर हे उपोषणास बसतील असा इशारा जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष देवानंद लुडबे यांनी निवेदनाद्वारे वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीला दिला आहे.

जय भूतनाथ पर्यटन संस्थेने याबाबत वायरी भूतनाथ ग्रामपंचायत सरपंच, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या स्मशान भूमीजवळ जाण्यासाठी व जवळ असलेल्या उभाटवाडीकडे रस्ता आहे, हा रस्ता वायरी भूतनाथ येथील समुद्र किनारी आहे. या ठिकाणी रिकामी जागा असून येथे समुद्राचे पाणी पावसाळ्यात व भरतीच्या वेळी रस्त्यावर येते. यासाठी चार वर्षापुर्वी बंधारा कम भिंत बांधून पर्यटकांच्या गाड्या पाकींग करण्यासाठी आणि पर्यटकांना बसण्यासाठी जागा निर्माण झालेली आहेत. याठिकाणी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि पर्यटक बसतात. याच रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतीने कचराकुंडी ठेवलेली आहे. या कचराकुंडीचा आधार घेऊन गावातील लोक व व्यवसायिक त्याठिकाणी कचरा टाकतात. हा कचरा रस्त्याच्या दोन्ही बाजुने समुद्राकडील वाऱ्यामुळे पसरला जातो. याशिवाय मोकाट गुरे, मोकाट कुत्रे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावरतात, यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. यामुळे गावातील लोकांना आणि बाहेर गावाहून येणाऱ्या पर्यटकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

कचराकुंडीतील व इतरत्र पसरलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. यासाठी यापुर्वी ग्रामपंचायतीकडे जय भूतनाथ पर्यटन संस्था मार्फत पत्रे दिलेली आहेत. प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधून तसेच उपाय सुचवून देखील प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदर कचऱ्याच्या समस्येवर उपाययोजना करावी अन्यथा दि. २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सदर स्मशान रोडवरच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर हे उपोषणास बसतील, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.

You cannot copy content of this page