संजू परब यांची मागणी; नगरसेवकांसह कचरा डेपोवर जाऊन केला स्पॉट पंचनामा
⚡ सावंतवाडी ता. ३१ –
सावंतवाडी येथील कचरा डेपोची सद्यस्थिती अत्यंत गंभीर असून तेथील कामगारांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे कामगार काम करत असून परिसरातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन, सावंतवाडी तालुक्यात नागरिकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी किमान २५ एकर जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केली.
आज कचरा डेपोला भेट देत नगरसेवकांसह त्यांनी स्पॉट पंचनामा केला. यावेळी बोलताना परब म्हणाले की, सध्या कचरा डेपोची अवस्था अत्यंत बिकट असून कामगारांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. भविष्यात या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी जागाही अपुरी पडणार आहे. तसेच येथील काही यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे.
“आमचा उद्देश कोणावरही टीका करण्याचा नाही, मात्र हा प्रश्न शहराच्या आणि नागरिकांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन २५ एकर जागा मंजूर करावी, जेणेकरून कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल,” असे परब यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आम्ही केवळ पाहणीसाठी नाही तर नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची पाहणी करण्यासाठी येथे आलो आहोत, असा टोला त्यांनी यावेळी भाजपला लगावला.
