२६ जानेवारीला रस्ता रोकोचा इशारा:रविकिरण गवस..
⚡दोडामार्ग ता.३१-: दोडामार्ग ते विजघर रस्त्याचे काम सध्या बेकायदेशीर, चुकीच्या पद्धतीने आणि जनतेला अंधारात ठेवून सुरू असल्याचा आरोप करत, अशा कामाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तीव्र विरोध करण्यात येईल, असा ठाम इशारा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष रविकिरण गवस यांनी दिला. कायदेशीर व योग्य पद्धतीने, जनतेला विश्वासात न घेता काम सुरूच राहिल्यास येत्या २६ जानेवारी रोजी रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोडामार्ग येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या रस्त्याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदारांकडे पत्रव्यवहार करण्यात आला असतानाही प्रशासनाने जबाबदारी झटकली असून बांधकाम विभाग व रस्ते विकास मंडळ एकमेकांकडे बोट दाखवत असल्याने ठेकेदार मनमानी करत असल्याचा आरोप गवस यांनी केला.
या रस्त्याचे अद्याप भूमिपूजन झालेले नाही, तात्पुरता सुरक्षित रस्ताही उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. रस्ता अत्यंत धोकादायक असून अपघात झाल्यास त्याची जबाबदारी शिवसेना पदाधिकारी व संबंधित ठेकेदारांनी घ्यावी, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना पदाधिकाऱ्यांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप करत, २९ नोव्हेंबर रोजी तिलारी येथे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी मान्य केले होते, मात्र आता त्यांनी भूमिका बदलल्याचा दावा गवस यांनी केला. ठेकेदार व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार दीपक केसरकर यांच्यावरही गवस यांनी टीका करत, मतांसाठी तालुका आठवतो मात्र जनतेला विश्वासात न घेता कामे लादली जात असल्याचा आरोप केला. हत्ती प्रश्नावरही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा घणाघात त्यांनी केला.
