आम.निलेश राणे: केसरकर मूडमध्ये आले आणि मैदानात उतरले तर अनेकांना आपले घराचे पत्ते बदलावे लागतील..
⚡सावंतवाडी ता.३०-: आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष हे कुडाळ मालवण मतदार संघात असून त्यानंतर सावंतवाडीत दुसरे लक्ष असून मित्र पक्षांकडून स्वबळाचा नारा देत उमेदवारांना मोठमोठे अमिष दाखवले जात आहेत, असा गंभीर आरोप आमदार निलेश राणे यांनी केला आहे.दरम्यान राणें म्हणाले, “आता किती दिवस गप्प बसायचं? गप्प राहण्याचे दिवस गेले. आता आपणही स्वबळाच्या मार्गावर चर्चा करायला हवी. त्यासाठी केसरकर साहेब आणि सामंत साहेब यांनी एकत्रित बैठक घ्यावी. केसरकर मूडमध्ये आले आणि मैदानात उतरले तर अनेकांना आपले घरचे पत्ते बदलावे लागतील,” अशी टोलेबाजी त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले, “आजपर्यंत आम्ही महायुतीच्या भूमिकेतून निवडणुकीची तयारी ठेवली आहे. मात्र, मित्र पक्ष जर स्वबळाचा नारा देत असेल तर आपणही आपली ताकद दाखवायला हवी. आपली किंमत काय आहे हे आता मैदानात दाखवून द्या,” असे आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.
राणे पुढे म्हणाले, “कुंपणावर उभे असणाऱ्यांनी आता भूमिका स्पष्ट करावी. केसरकरांनी फक्त ग्रीन सिग्नल दिला, की आपला हॉल होईल हाउसफुल. समोर काहीच शिल्लक राहणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
