भाजपला मोठा धक्का: आम्ही निवडणुकीला घाबरत नाही, स्वबळावर लढण्याची आमची तयारी, तर भाजपच्या स्थानिक नेत्याला वाढदिवसाच्या गिफ्ट, संजू परबांचा नाव न घेता महेश सारंग यांना टोला….
⚡सावंतवाडी, ता.२४-:
सावंतवाडी भाजपला आज मोठा धक्का बसला असून, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय गोंदावळे, भाजप युवक शहराध्यक्ष राज वरेरकर तसेच पक्षाचे बुथ प्रमुख यांनी भाजपचा राजीनामा देत शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या कार्यप्रेरणेने त्यांनी हा निर्णय घेतला असून, हा प्रवेश संजू परब यांच्या नेतृत्वाखाली झाला.
या वेळी बोलताना संजू परब म्हणाले की, “अजय गोंदावळे यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात सक्रियपणे काम केले असून, त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. आजचा प्रवेश हा केवळ प्रारंभ आहे; येत्या काही दिवसांत आणखी कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होणार आहेत.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही निवडणुकीला घाबरत नाही. आमच्याकडे अंगावर घेण्याची ताकद आहे. त्यामुळे कोणाच्याही दबावाला आम्ही घाबरणार नाही.”
तसेच भाजपवर अप्रत्यक्ष टीका करत परब म्हणाले, “हा प्रवेश म्हणजे भाजपच्या एका नेत्यासाठी वाढदिवसाचे गिफ्ट आहे,” असा टोला त्यांनी महेश सारंग यांना लगावला.
या प्रवेशामुळे सावंतवाडीतील राजकीय समीकरणांमध्ये चांगलाच बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
