Headlines

आरोग्य संपन्न गावाच्या घोषणांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सुविधा सुरू करा…

बांद्यासह सावंतवाडी तालुक्यात हिंदलॅब रक्त तपासणी सेवा महिनाभरापासून बंद; सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांचा आरोग्य विभागाला सवाल..

⚡बांदा ता.२१-: सावंतवाडी तालुक्यात ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची कार्यशाळा उत्साहात पार पडत असतानाच, दुसरीकडे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सुविधांची दुरवस्था समोर आली आहे. बांद्यासह तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हिंदलॅबची रक्त तपासणी सेवा महिनाभरापासून बंद असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते गुरुदास वासुदेव गवंडे यांनी केली आहे. या सेवेमुळे गोरगरीब रुग्णांना खासगी प्रयोगशाळांमध्ये पैसे खर्च करून तपासण्या कराव्या लागत असल्याने त्यांनी आरोग्य विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षांनी सावंतवाडी तालुक्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गवंडे यांनी केला. केवळ कार्यशाळा, भाषणे आणि घोषणांनी गावे आरोग्यसंपन्न होणार आहेत का? प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त तपासणीची सुविधाच उपलब्ध नसेल, तर सामान्य नागरिकांनी उपचारांसाठी कुठे जायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रशासनाला सहा सवाल
सावंतवाडी तालुक्यातील किती प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हिंदलॅब सेवा बंद आहे? सेवा बंद पडण्यामागे कंपनीची थकीत देयके की प्रशासकीय नियोजनाचा अभाव आहे? रुग्णांना पर्यायी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत का? कंपनीची देयके अदा करण्यासाठी कोणती कार्यवाही झाली? बंद केंद्रे पुन्हा सुरू करण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली आहे का? तसेच आरोग्य अभियान राबविणाऱ्या प्रशासनाची स्वतःच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नाही का? असे प्रश्न गवंडे यांनी उपस्थित केले आहेत.
आधी सुविधा सुरू करा, मग अभियानांचा गाजावाजा करा!
आरोग्य संपन्न गावाच्या घोषणा करण्यापेक्षा गावातील रुग्णांना वेळेवर तपासणी, औषधे आणि उपचार मिळतात का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आधी आरोग्य सुविधा सुरू करा, मग अभियानांचा गाजावाजा करा, असे गवंडे यांनी स्पष्ट केले.
रस्ते, इमारती आणि विकासकामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम सुरू असताना अस्तित्वात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची तपासणी कोण करणार, असा सवालही त्यांनी केला. नवीन इमारती उभारण्याबरोबरच त्यामध्ये रुग्णांना आवश्यक आरोग्यसेवा मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याची मागणी
एचएलएल कंपनीची सुमारे ११०० कोटी रुपयांची देणी शासनाकडे थकीत असल्याचा दावा करण्यात येत असून, राज्यातील सुमारे ४०० महालॅब व डायलिसिस केंद्रांच्या सेवांवर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. या आकडेवारीची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे पडताळणी होणे आवश्यक असल्याचे गवंडे यांनी म्हटले आहे.
हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर ठोस निर्णय घेऊन संबंधित कंपनीची देणी अदा करावीत आणि बंद असलेल्या आरोग्य सेवा तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. शासनाकडे निधीची कमतरता असेल, तर सामाजिक कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रात भीक मागून निधी जमा करून देण्यासही तयार आहेत; मात्र गोरगरीब रुग्णांची होणारी परवड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आरोग्य विभागाकडून लेखी खुलाशाची मागणी
हिंदलॅब सेवा बंद असण्यामागील कारणे, कंपनीच्या थकीत देयकांची वस्तुस्थिती, बंद केंद्रांची अधिकृत संख्या आणि सेवा पुन्हा सुरू करण्याचे नियोजन याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद प्रशासन आणि राज्याच्या आरोग्य विभागाने लेखी खुलासा करावा, अशी मागणी गवंडे यांनी केली आहे.
आरोग्य अभियानाचे खरे यश बक्षिसे आणि क्रमांकात नसून सामान्य रुग्णाला वेळेवर आणि मोफत आरोग्यसेवा मिळण्यात आहे. त्यामुळे प्रशासनाने घोषणांपेक्षा कृतीतून उत्तर द्यावे, असे गुरुदास गवंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. बंद असलेल्या आरोग्य सेवा तातडीने सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
फोटो:-
पासपोर्ट.

You cannot copy content of this page