Headlines

कुडाळमध्ये २९ डिसेंबरपासून लायन्स फेस्टिव्हल; ८५ हून अधिक स्टॉल्सचा सहभाग…

तीन दिवशीय ऑटो एक्स्पो, इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलचे आयोजन:सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्थानिक कलाकारांचा होणार गौरव..

⚡कुडाळ ता.२१-: लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्ग आणि लायन्स सेवा संकुल कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर २९ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात लायन्स ऑटो एक्स्पो, इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हलसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे, मुंबई, कोल्हापूर आणि अन्य भागांतील ८५ हून अधिक स्टॉल्स या महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती लायन्स सेवा संकुलचे अध्यक्ष अॅड. अमोल सामंत यांनी दिली.
कुडाळ येथील हॉटेल लेमनग्रास येथे शुक्रवारी सायंकाळी उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अॅड. अजित भणगे, सीए सुनील सौदागर, अॅड. श्रीनिवास नाईक, सीए सागर तेली, लायन्स क्लबच्या अध्यक्ष स्नेहा नाईक, आनंद कर्पे, डॉ. अमोघ चुबे, अॅड. शेखर वैद्य आदी उपस्थित होते.
अॅड. सामंत यांनी सांगितले की, लायन्स महोत्सवाची सुरुवात १९९८ मध्ये झाली. गोवा राज्यात अशा प्रकारचे महोत्सव आयोजित केले जात असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशा उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने लायन्सने इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिव्हल सुरू केला. त्यानंतर या महोत्सवाची परंपरा कायम राहिली. लायन्स क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांनीही काही वर्षे संयुक्तपणे महोत्सवाचे आयोजन केले. त्यानंतर एक वर्षाआड दोन्ही संस्थांकडून महोत्सव आयोजित करण्यात येऊ लागला. यंदा लायन्स क्लबकडे आयोजनाची जबाबदारी असून महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून लायन्स पदाधिकारी गणेश म्हाडदळकर काम पाहत आहेत.
२९, ३० आणि ३१ डिसेंबर या तीनही दिवशी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत महोत्सव सुरू राहणार आहे. यामध्ये ऑटो एक्स्पो, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच विविध वस्तूंचे स्टॉल्स असतील. स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच जिल्ह्यातील पर्यटन आणि व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवाला आमदार निलेश राणे यांचेही सहकार्य लाभणार आहे.
अॅड. अजित भणगे यांनी सांगितले की, महोत्सवाच्या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी जिल्ह्याबाहेरील कलाकारांचे, तर दुसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. सिंधुदुर्गातील नामांकित लोककलांना आणि कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव आणि मान्यवरांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
सीए सागर तेली यांनी महोत्सवाचा दर्जा आणि वेगळेपण जपण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांगितले. विविध प्रकारच्या स्टॉल्ससह स्थानिक आणि बाहेरील नामांकित कलाकारांचे कार्यक्रम हे महोत्सवाचे आकर्षण असेल. कुडाळमधील उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अॅड. शेखर वैद्य यांनी सांगितले की, महोत्सवासाठी आतापर्यंत जवळपास ६० टक्के स्टॉल्सचे बुकिंग पूर्ण झाले असून ८५ हून अधिक स्टॉल्स सहभागी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे खरेदी, खाद्यसंस्कृती, उद्योग आणि मनोरंजन यांचा संगम असलेला हा महोत्सव कुडाळवासीयांसह जिल्ह्यातील नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहे.

You cannot copy content of this page