कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांचे पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक यांना आश्वासन..

⚡बांदा ता.२१-: तिलारी प्रकल्पांतर्गत बांदा शाखा कालव्यातून १ जानेवारीपासून पाणी सोडण्यात येईल. तसेच कालव्यात वाढलेली झाडे, गवत व साचलेल्या मातीची दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चराठे-सावंतवाडीचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक यांना दिले. बांदा परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर नाईक यांनी पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे. तिलारी प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याने बांदा, विलवडे, वाफोली आदी परिसरातील भूजल पातळी घटली आहे. अनेक विहिरींनी तळ गाठल्याने नोव्हेंबर महिन्यातच नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक यांनी शुक्रवारी कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांची भेट घेतली.
बांदा शहर विकास आघाडीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात कालव्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यात आले. कालव्यावर पाटबंधारे विभागाच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पुरेसे लक्ष नसल्याने गेल्या अनेक वर्षांत कालव्यात मोठ्या प्रमाणात झाडे, गवत व माती साचली आहे. त्यामुळे कालव्याची पाणीवहन क्षमता कमी झाली असून, त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
कार्यकारी अभियंता पाटील यांनी स्वतः कालव्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि दुरुस्तीच्या कामांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला. यावेळी झालेल्या चर्चेत कार्यकारी अभियंता पाटील यांनी दोन दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच १ जानेवारीपासून कोणत्याही परिस्थितीत कालव्यात पाणी सोडण्यात येईल, असे स्पष्ट केले. मात्र, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. कार्यकारी अभियंत्यांना घेराव घालण्यात येईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला.
यावेळी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा उबाठा शिवसेनेचे बांदा शहराध्यक्ष साईप्रसाद काणेकर, मनसेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, सुशांत पांगम, निखिल मयेकर, ओंकार नाडकर्णी, विठ्ठल वाळके, विशू पावसकर, संदेश नाईक, राजदीप पावसकर, ज्ञानेश्वर येडवे आदी बांदा शहर विकास आघाडीचे सदस्य उपस्थित होते.
फोटो:-
ऋतिका नाईक.
