ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सुविधाही लवकरच देणार पालकमंत्री नितेश राणे..

⚡कणकवली ता.२०-: कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना अखेर यश आले असून, प्लॅटफॉर्म क्रमांक २ येथे उभारण्यात आलेल्या प्रवासी शेडचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यासोबतच अद्ययावत सिग्नल यंत्रणा आणि कोच इंडिकेटर सुविधेचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला, तर ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकावर लिफ्ट उभारण्याच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. या प्रसंगी बोलताना पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रवाशांच्या सुविधांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, कणकवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांसाठी शेड उभारण्याची मागणी फार जुनी होती. प्रवासी संघटनेचीही ही महत्त्वाची मागणी होती. रेल्वे खात्याबरोबर सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर त्याला यश आले असून आज या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले आहे. प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची अडचण दूर करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. कोकण रेल्वे ही आपल्या भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रवासाचे साधन आहे. मुंबईसह राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांशी जोडण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी कोकण रेल्वेचा वापर करतात. त्यामुळे रेल्वेची वाट पाहताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा मिळाव्यात, या दृष्टिकोनातून सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेडप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची मागणी करण्यात आली होती. अनेक ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे स्थानकावर ये-जा करताना तसेच प्लॅटफॉर्म बदलताना अडचणींचा सामना करावा लागतो. ही गैरसोय लक्षात घेऊन लिफ्ट सुविधेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. लवकरात लवकर ही सुविधाही प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून प्रवाशांच्या मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात कणकवलीसह सिंधुदुर्ग आणि कोकणातील प्रत्येक रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासन आवश्यक पावले उचलत आहे. रेल्वे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
प्रवाशांना ऊन – पावसाच्या त्रासातून मोठा दिलासा
कणकवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर शेडची सुविधा नसल्याने रेल्वेची प्रतीक्षा करताना प्रवाशांना ऊन आणि पावसाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि सामानासह प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. प्रवासी संघटनेने यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर ही मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अद्ययावत यंत्रणेमुळे रेल्वे संचालन अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम
याच कार्यक्रमात अद्ययावत सिग्नल यंत्रणेचाही शुभारंभ करण्यात आला. या आधुनिक यंत्रणेमुळे रेल्वे गाड्यांची ये-जा नियंत्रित करणे, रेल्वे मार्ग सुरक्षित ठेवणे तसेच सिग्नल आणि रेल्वे पॉइंट्समध्ये योग्य समन्वय राखणे अधिक सुलभ होणार आहे. परिणामी रेल्वे संचालन अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. याशिवाय, प्रवाशांना आपली गाडी नेमकी कोणत्या ठिकाणी थांबणार आहे हे समजावे, यासाठी ‘कोच इंडिकेटर’ सुविधेचाही शुभारंभ करण्यात आला. यामुळे प्रवाशांना आपल्या डब्याचे स्थान ओळखणे सोपे होणार असून प्लॅटफॉर्मवरील धावपळ टळणार आहे. एकाच कार्यक्रमात या सर्व सुविधांचा शुभारंभ व भूमिपूजन झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाला कोकण रेल्वेच्या रत्नागिरी मंडलचे मंडल रेल्वे व्यवस्थापक शैलेश बापट, उपमुख्य कार्यकारी अभियंता संजय किल्लेदार, गोकुळ सोनवणे (ए.एस.सी., रत्नागिरी), राजेश सुरवाडे (पीआय, आरपीएफ कणकवली), सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, पंचायत समिती सदस्य प्रदीप गावडे, सहदेव उर्फ अण्णा खाडये, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे, नगरसेवक राकेश राणे, स्वप्नील राणे, दादू राणे, मेघा गांगण, पप्पू पुजारे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, औदुंबर राणे, माजी नगरसेवक अभय राणे, अमोल रासम, सागर राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि सेवानिवृत्त तहसीलदार आर. जे. पवार आदी मान्यवर व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
