Headlines

स्त्री-पुरुष सहकार्याचा संदेश देत बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत पुरुष दिन साजरा…

महिला कर्मचाऱ्यांकडून पुरुष सहकाऱ्यांचे औक्षण:कुटुंब आणि समाजातील पुरुषांच्या योगदानाचा गौरव..

⚡कुडाळ ता.२१-: कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना तसेच सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असताना अनेकदा स्वतःच्या गरजा आणि भावनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांच्या योगदानाची जाणीव ठेवत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांच्या वतीने पुरुष कर्मचाऱ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच त्यांच्या हस्ते केक कापून त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
पुरुष हा वरकरणी कणखर दिसत असला, तरी त्याच्या मनातही हळवेपणा, माया आणि संवेदनशीलता असते. संसाराचा गाडा हाकताना पत्नीच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडणे आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणे, अशा विविध भूमिका पुरुष पार पाडत असतात. मात्र, या धावपळीत त्यांना स्वतःसाठी वेळ देणे अनेकदा शक्य होत नाही. हीच जाणीव ठेवून संस्थेच्या सीईओ अमृता गाळवणकर, संस्था सल्लागार पल्लवी कामत, सायली वारंग, सीबीएसई विभागाच्या प्राचार्य चैताली बांदेकर, चित्रा कुंटे, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य वैशाली ओटवणेकर, शांभवी मार्गी तसेच महिला प्राध्यापक, शिक्षिका आणि कर्मचारी यांच्या पुढाकारातून या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक आणि शिक्षकांनी पुरुषांच्या कणखर वृत्तीचे, जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्याच्या क्षमतेचे आणि त्यांच्या सहनशीलतेचे कौतुक केले. कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत पुरुषांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत त्यांच्या त्यागभावनेचा गौरव करण्यात आला.
जागतिक पुरुष दिनाचे औचित्य साधून महिला सहकाऱ्यांनी आपल्याप्रति व्यक्त केलेल्या आदरभावाबद्दल पुरुष कर्मचाऱ्यांनी आभार मानले. स्त्री-पुरुषांनी परस्परांना समानतेने साथ देत, सहकार्य आणि मानवतेच्या भावनेतून एकत्रितपणे कार्य केल्यास अधिक समृद्ध आणि सुजलाम-सुफलाम समाजाची निर्मिती होऊ शकते, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page