Headlines

वृक्षलागवड न करताच ५.९५ लाखांचे बिल अदा..?

पंचायत समितीच्या बैठकीत लक्ष्मण गावडे आक्रमक

⚡कणकवली ता.२१-: रस्त्याच्या कडेला लावलेल्या वृक्षलागवडीचा मुद्दा पंचायत समितीच्या बैठकीत भरपूर गाजला. हळवल, शिरवल मार्गावर एकही झाड लावण्यात आलेले नाही, अशी माहिती पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर सदस्य लक्ष्मण गावडे यांनी या मार्गावरील झाडांसाठी सुमारे सहा लाखाचे बिल अदा करण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त झाल्याचे सभागृहात सांगितले. एकाच कार्यालयाकडील कार्यवाहीबाबत अशी वस्तूस्थिती असेल तर संबंधीत ठेकेदाराला काळ्या यादीत टाका आणि बिल काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी श्री. गावडे यांनी केली.

कणकवली पंचायत समितीची मासिक बैठक शुक्रवारी पं. स. च्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात झाली. व्यासपिठावर सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश सावंत, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण उपस्थित होते. सुरूवातीलाच सिंधुदुर्ग ते नवी मुंबई अशी विमानसेवा सुरू झाल्याबद्दल पालकमंत्री नीतेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

मागील बैठकीत रस्त्याच्याकडेला पीडब्ल्यूडीकडून लावण्यात आलेल्या झाडांबाबत माहिती देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याबाबतचा प्रश्न सदस्य लक्ष्मण गावडे यांनी उपस्थित केला. यावर अखत्यारितील मार्गावर वृक्षलागवड करण्यात आलेली आहे, असे थातूरमातूर लेखी उत्तर देण्यात आले होते. मात्र सदस्य लक्ष्मण गावडे यांनी, या वृक्षलागवडीबाबत संबंधित ठेकेदाराकडून नियम पाळण्यात आलेले नाहीत. काही ठिकाणी वृक्षलागवडच करण्यात आलेली नाही. याबाबतचे व्हीडिओ देखील माझ्याकडे आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी माहितीमध्ये हळवल – शिरवल मार्गावर वृक्षलागवडीच्या समोरच्या रकान्यात ‘शून्य’ असे म्हटले आहे. मात्र याबाबत माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीमध्ये ५.९५ लाखाचे ‘आरए’ बिल अदा केल्याचे म्हटले आहे. एकाच विभागाच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीमध्ये एवढी तफावत कशी? संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी श्री. गावडे यांनी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी काही नियमितता नसल्याने नंतर बिल अदा करण्यात आले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

कळसुली येथील महावितरणकडून लाईनचे काम अद्याप प्रलंबीत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी रस्त्याला वायर ‘क्रॉस’ कराव्या लागणार असल्याने भविष्यात धोका उद्भवू नये याची दक्षता घेऊन काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हुंबरट उर्दूशाळा शिक्षकाची देवगड येथील कामगिरी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. कासार्डे येथे बीएसएनएल टॉवरच मंजूर नसल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

महामार्गावर काहीवेळा अपघातात जनावरे मृत झाल्यानंतर ती कित्येक दिवस तशीच रस्त्यावर असतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते. ठेकेदारांना यावर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याची मागणी करण्यात आली. शालेय स्पर्धा काळोख पडेपर्यंत न घेता सायंकाळी ५.३० पर्यंत घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. नाटळ खांदारवाडी शाळेनजीक तीव्र उतार व वळणामुळे अपघाताची शक्यता आहे. तेथे गतिरोधकासह फलक लावण्याची मागणी करण्यात आली.

उपसभापती राजेश सावंत यांनी काही दोन पटाच्या शाळांवर दोन शिक्षक तर जास्त पटाच्या शाळेवरही दोन शिक्षक आहेत. अशावेळी कमी पटाच्या शाळांच्या शिक्षकांना कामगिरी काढून त्यांना तेथे हजर करण्याच्या सूचना देण्याची मागणी केली. हळवल फाटा येथे बसविण्यात आलेला सोलर हायमास्ट एक महिन्यात बंद पडला, कलमठ गावडेवाडी शाळा शेडची व इतर शाळांच्या दुरुस्ती आदी प्रश्नही उपस्थित करण्यात आले.

खारेपाटण येथे मटका, जुगार, गोवा दारु आदी अवैध धंदे वाढत आहेत. पोलिसांनी त्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. घोणसरी फोंडा वस्तीची फेरी पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली. ग्रामपंचायत क्षेत्रात प्लॉटिंग केल्यावर खुले आरक्षीत क्षेत्र ग्रामपंचायतीने आपल्या नावावर करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या. हुंबरट येथील विजयकर स्कूलच्या काही विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल राखून ठेवण्यात आला होता. आता या विद्यार्थ्यांना मायग्रेशन सर्टीफिकेट देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणखी एक वर्ष वाया जाणार की काय? या शाळेची मान्यता रद्द करण्याच्या प्रस्तावाचे काय झाले, असा सवाल श्री. गावडे यांनी केला. देवघर प्रकल्प आणि कणकवली बिजलीनगर येथील जागेत एमआयडीसी विकसीत करावी, अशी मागणी श्री. गावडे यांनी केली. चर्चेत गुरुप्रसाद शिंदे, अण्णा खाडये, सायली कृपाळ आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

बॉक्स :

दुष्काळाबाबत गांभिर्याने घ्या !

दिगवळे येथील नळयोजना दोन वर्ष झाली तरी सुरू नसल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. यावेळी अधिकाऱ्यांनी निधी नसल्याने हे काम बंद ठेवण्यात आल्याचे सांगितले. तर शहरातील कनकनगर येथील बंधाऱ्यात लावण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटस्मधून गळती होत आहे. ठेकेदाराने प्लेटसूची डागडुजी करून नंतर त्या बसवायच्या असताना, त्या आहेत तशाच बसविण्यात येत आहेत. त्याचा उपयोग काय, असा सवाल करण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी लिकेज असल्याचे मान्य केले. मात्र त्यावर उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. नऊ पैकी ५ बंधाऱ्यांना प्लेटस् घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचले तरच ठेकेदाराचे पैसे द्या. हळवल येथे तर बंधाऱ्याच्या ठिकाणी अद्याप प्लेटस्देखील आणून ठेवण्यात आलेल्या नाहीत. मग प्लेटस् लावणार तरी कधी? ठेकेदाराला पैसे देण्यासाठीच वर्क ऑर्डर काढण्यात आली का? यावर्षीचा दुष्काळ मोठा आहे, तो गांभिर्याने घ्या, अशी सूचना सदस्यांनी केली.

You cannot copy content of this page