*रुग्णालयाची ओळख उपचारांच्या गुणवत्तेने निर्माण होते ;खासदार नारायण राणे..

⚡कणकवली ता.२१-:
रुग्णालयाचे उद्घाटन झाले, नारळ फोडला किंवा भव्य प्रवेशद्वार उभारले म्हणजे रुग्णालयाची ओळख निर्माण होत नाही. उपचारासाठी आलेल्या प्रत्येक रुग्णाला ठणठणीत बरे करून पाठवणे, हाच डॉक्टरांचा खरा धर्म आणि जबाबदारी आहे. डॉक्टरांचे ज्ञान, अनुभव आणि कौशल्य यांचा योग्य वापर रुग्णांच्या उपचारासाठी झाला पाहिजे. रुग्णालयाची खरी विश्वासार्हता ही तेथील डॉक्टरांनी दिलेल्या सेवेतून निर्माण होते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केले.
डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या तरेळे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
खासदार नारायण राणे म्हणाले, डॉक्टरांची जीभ, हात आणि मेंदू या तिन्ही गोष्टींचा योग्य वापर झाला, तर रुग्णांना उत्तम आरोग्यसेवा देता येते. डॉक्टर किती हुशार आहेत, यापेक्षा त्यांनी रुग्णांवर केलेले उपचार आणि त्यांना दिलेली सेवा अधिक महत्त्वाची आहे. रुग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरा होऊन रुग्णालयातून बाहेर पडतो, तेव्हाच त्याच्या मनात डॉक्टर आणि रुग्णालयाविषयी खरा विश्वास निर्माण होतो.
चैतन्य नर्सिंग होमच्या माध्यमातून या परिसरात एक चांगली आरोग्य सुविधा सुरू होत आहे, ही आनंदाची बाब आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना उपचारांसाठी दूरवर जाण्याची गरज कमी होईल. मात्र, कोणत्याही रुग्णालयाचे भवितव्य हे तेथून रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असेल. डॉ. कुलकर्णी यांनी या रुग्णालयाला पुरेसा वेळ देऊन येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार मिळतील आणि त्याला न्याय मिळेल, याची काळजी घ्यावी. रुग्णांचा विश्वास संपादन करणे हेच रुग्णालयाचे खरे यश असेल, असेही खासदार राणे यांनी स्पष्ट केले.
