Headlines

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या नीरजा पवारची राज्य बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण भरारी…

९ वर्षांखालील एकेरी गटात पटकावले सुवर्णपदक:देवांश कोळीचीही उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल..

⚡कुडाळ ता.२१-: येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूलची इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कु. नीरजा राजेश पवार हिने तिसऱ्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. ९ वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत तिने राज्य अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. तिच्या या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
YONEX-SUNRISE GH RAISONI MEMORIAL आणि नागपूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नीरजाने आपल्या खेळातील कौशल्य, चपळता आणि जिद्दीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
याच प्रशालेतील इयत्ता दुसरीचा विद्यार्थी कु. देवांश योगेश कोळी यानेही स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारत राज्यस्तरावर आठवे स्थान मिळवले.
या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, प्रशालेच्या प्राचार्या चैताली बांदेकर, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे आणि सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. त्यांच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page