रुपेश राऊळ यांची टीका:शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता नसलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला पुन्हा निवडून देऊ नका..
⚡सावंतवाडी, ता.२४-: कोकणचा बळी म्हणजे शेतकरी आणि बागायतदार. हवामान बदल, अतिवृष्टी आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र, या भागातील लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याची टीका शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केली.
राऊळ म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून हत्तींच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. दररोज वर्तमानपत्रांतून अशा घटना प्रसिद्ध होत आहेत, तरीही स्थानिक आमदार, खासदार किंवा पालकमंत्री शेतकऱ्यांची भेट घ्यायला देखील तयार नाहीत. सरकारकडून केवळ पंचनामे केले जातात, पण प्रत्यक्ष नुकसानभरपाई मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही.”
ते पुढे म्हणाले, “एकेकाळी माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी हत्ती पकड मोहिम राबवली होती. त्या काळात शेतकऱ्यांच्या वेदना लक्षात घेऊन प्रयत्न झाले, पण आज तशी तळमळ कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून दिसत नाही.”
“गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, उपोषण करत आहेत; अधिकारी फक्त पाहणी करून जातात. कुणी ठोस कारवाई करत नाही. प्रस्ताव, घोषणा आणि पत्रकार परिषदा इतक्यावरच सर्व काही थांबतं. प्रत्यक्ष नुकसानभरपाई, विमा रक्कम किंवा कर्जमाफी कधी मिळणार हे आजही अनिश्चित आहे.”शेतकऱ्यांच्या जमिनी “दिल्ली, गुजरात येथील लोक कोकणातील शेती खरेदी करत आहेत. स्थानिक शेतकऱ्यांना मात्र परिस्थितीमुळे आपली जमीन विकावी लागत आहे. हा कोकणातील शेतकऱ्यांच्या जीवनातील दुर्दैवी प्रसंग आहे,” असे राऊळ म्हणाले.
तसेच “शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशीलता नसलेल्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला पुन्हा निवडून देऊ नका. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याशी नाळ असणारा, मातीतला आणि जनतेच्या वेदना जाणणारा नेता निवडून द्या.”असे आवाहन राऊळ यांनी केले.
