अचानक पडलेल्या पावसाने उडाली तारांबळ…

⚡वेंगुर्ला ता.१४-: सर्वत्र सध्या तुलसी विवाहाच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यात आज गुरुवारी सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावल्याने लग्न कार्यात विघ्न निर्माण झाले. त्यामुळे या सणाच्या उत्साहाबाबत हिरमोड झाला.

  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने रत्नागिरी आणि सिधुदुर्गासह आठ जिल्ह्यात १४ व १५ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. आज गुरुवारी सकाळपासूनच वेंगुर्ल्यामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सायंकाळी पावसाने हजेरी लावलीच. बुधवारपासून प्रारंभ झालेला तुलसी विवाह समारंभ शुक्रवारपर्यंत चालणार आहे. त्यामुळे आजही काही ठिकाणी तुलसी विवाह आयोजित केले होते. अचानक पडलेल्या पावसाने मात्र, त्यांची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे कोकणातील जत्रौत्सवांनाही प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ब-याच देवस्थानांचा जत्रौत्सव संपन्न होणार आहे. या जत्रौत्सवाच्या माध्यमातून बरेचजण आपला व्यवसायही करतात. दोन ते तीन महिन्याच्या हंगामात विक्रेत्यांना आर्थिक लाभ होतो. परंतु, या पावसाने मात्र त्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. पाऊस सतत सुरू राहिल्यास भाविकही मंदिरात येण्यास टाळाटाळ करण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित देवस्थानांनाही हा पाऊस म्हणजे डोकेदुखी ठरला आहे.
You cannot copy content of this page