कुडाळ मध्ये हजारोंच्या उपस्थितीत होणार पक्ष मेळावा:जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांची माहिती..
कुडाळ : बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या कुडाळ मध्ये येत असून त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांचा सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षात प्रवेश होणार आहे. त्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून सुमारे 15 ते 20 हजार उपस्थितीत निलेश राणे यांचा पक्ष प्रवेश होणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी सांगितले. ते आज कुडाळमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर, जिल्हा संघटक रुपेश पाववसकर, मालवण तालुका प्रमुख राजा गावकर, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, अमोल सावंत आदी उपस्थित होते.
बयावेळी बोलताना संजय आंग्रे म्हणाले, निलेश राणे यांचा शिवसेना पक्ष प्रवेश भव्य दिव्य करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, मंत्री उदय सामंत, दीपक केसरकर, दादा भुसे, भरत गोगावले, रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या पक्ष सोहळ्याला सुमारे 15 ते 20 हजार पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत राणे यांना मानणारा ही एक वेगळा गट आहे त्यामुळे मोठ्या संख्येने इथे सर्वजण उपस्थित राहतील.
निलेश राणे यांच्या प्रवेशानंतर त्यांचे सहकारी तसेच बरेच जण पक्ष प्रवेश करणार आहेत असे ही त्यांनी सांगितले.
या जिल्ह्यात महायुतीने दिलेले तीनही उमेदवार कसे निवडून येतील याकरिता महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते कार्यरत राहणार असून तीनही महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचेही आंग्रे यांनी सांगितले.
दरम्यान उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश कार्यक्रम स्थळी जात मंडप तसेच इतर गोष्टींची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधितांना दिल्या.
