तेली-उपरकर यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल…

वैभव नाईक:उपरकर-तेली यांचा कुडाळमध्ये सत्कार:राणे-केसरकर यांच्यावर सर्व नेत्यांची टीका..

कुडाळ : परशुराम उपरकर आणि राजन तेली यांचा योग्य सन्मान शिवसेनेत केला जाईल असे अभिवचन आमदार वैभव नाईक यांनी दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात अलीकडेच प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांचा आज कुडाळ मध्ये स्वागतपर सत्कार करणार आला. त्यावेळी ते बोलत होते.
येथील महालक्ष्मी हॉल मध्ये या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार वैभव नाईक, राजन तेली, परशुराम उपरकर, भाई गोवेकर, संजय पडते, जान्हवी सावंत, श्रेया परब, हरी खोबरेकर, अमरसेन सावंत, राजन नाईक, मंदार शिरसाट, किरण शिंदे, संतोष शिरसाट, मेघा सुकी, श्रेया गवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपरकर आणि तेली यांचा योग्य सन्मान शिवसेनेत केला जाईल असे अभिवचन आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिले. राजन तेली यांची उमेदवारी येत्या दोन दिवसात जाहीर केली जाईल असे आमदार वैभव नाईक सांगितले. माजी खासदार निलेश राणे, दीपक केसरकर यांच्यावर त्यांनी टीका केली.येणारे 25 दिवस उद्धाव ठाकरे यांच्यासाठी द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सत्काराला उत्तर देताना राजन तेली यांनी आपण 2005 मध्ये चूक केल्याचे मान्य केले. शिवसेनेत पुन्हा आल्यावर आपल्या कुटुंबात आल्यासारखे वाटल्याचे तेली म्हणले. बूथ ही मोठी ताकद आहे. त्या दृष्टीने योग्य नियोजन केले पाहिजे असे तेली म्हणाले. संघटना धगधगती ठेण्यासाठी एकत्र या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आपण सर्व लोकांनी नारायण राणेंना मोठे केले. पण आता राणे प्रायव्हेट कंपनी येथे चालू देणार नाही. आता आम्ही सगळे शिवसैनिक एक झालो आहेत असे सांगून परशुराम उपरकर यांनी राणेंवर टीका केली. आज पुत्र आलेत उद्या यांचे नातू येतील हे ओळखा, असे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्याना केले. 1990 मध्ये आलेल्या माणसाला त्यांच्या मुलासह जिल्ह्यातून माघारी पाठवायचे आहे असे ते त्यांनी सांगितले.
राजन तेली आणि परशुराम उपरकर यांच्या येण्याने एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.असे शिवसेनेच्या उपनेत्या जान्हवी सावंत यांनी सांगितले तर या जिल्ह्यात तिन्ही आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच असतील असा विश्वास जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी राजन नाईक, हरी खोबरेकर, श्रेया परब, भाई गोवेकर यांनी आपल्या मनोगतातुन जुन्या आठवणी जागृत करतानाच वैभव नाईक यांना तिसऱ्यांदा कुडाळ मालवण मतदार संघातून विजयी करण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बबन बोभाटे यांनी केले. सत्कार सोहळ्याला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page