ओबीसी महासंघ विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत…

जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर:तर वंचितचा ओबीसी महासंघाला पाठिंबा;महेश परुळेकर..

⚡कुडाळ ता.१४-: ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात  आपले उमेदवार उभे करण्याच्या विचारात आहे. या संदर्भात प्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली जाणार आहे आणि येत्या आठ दिवसात उमेदवार जाहीर केले जातील, अशी माहिती सिंधुदुर्ग ओबीसी व आरक्षित महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांनी  दिली.  कुडाळ येथे ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान गरज पडल्यास वंचित बहुजन आघाडी आपले स्वतंत्र उमेदवार उभे न करता ओबीसी महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा देईल असे वंचित आघाडीच्या वतीने महेश परुळेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
     कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघाची बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भंडारी समाजाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर, ओबीसी व आरक्षित समाजाचे महासचिव ऍड. नंदन वेंगुर्लेकर, सोनार समाज राज्य समन्वयक काका कुडाळकर, वैश्य समाज जिल्हाध्यक्ष सुनील भोगटे, नामदेव समाजाचे व युवा अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ भांबुरे, नाभिक समाजाचे किशोर लाड, वैश्य समाजाचे बाळासाहेबबोर्डेकर, जिल्हा गावित समाजाचे संघटक रवीकिरण तोरसकर, वैश्य समाज पतसंस्थेचे संचालक ऍड. समीर वंजारी, जिल्हा तेली समाज कार्यकारणी सदस्य साईनाथ आंबेरकर, गाबित समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पराडकर आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना नितीन वाळकेम्हणाले की, आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत.  पण लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकीमध्ये ओबीसी व आरक्षित समाजाचे प्रतिबिंब दिसले पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी व आरक्षित समाज हा ७० टक्के आहे.   म्हणून येत्या विधानसभांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही मतदार संघामध्ये ओबीसी व आरक्षित समाजाचे उमेदवार देण्यात येणार आहेत.  याचे कारण असे आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेतील तरतुदी या किती महत्त्वाच्या आहेत हे आता ओबीसी समाजाच्या नेत्यांना समजून चुकले आहे. जे आर्थिक निकषावर आरक्षण मागण्यासाठी पुढाकार घेत होते त्यांना आता घटनेतील तरतुदीनुसार मिळालेल्या आरक्षणाचे महत्त्व समजले आहे.  ओबीसी व आरक्षित समाजाचा आतापर्यंत इतर समाजाने वापर करून घेतला आहे.  त्यामध्ये स्वतःचे अस्तित्व राखून ठेवून लाभाची पदे घेतली आणि निर्णय क्षमतेमध्ये आरक्षित समाजाला डावलले. पण आता या जिल्ह्यातील ओबीसी व आरक्षित समाज ही लढाई लढण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या निवडणुकीत या समाजाचे उमेदवार रिंगणात उतरले जाणार आहेत.  तत्पूर्वी या संदर्भात प्रत्येक समाजाच्या महत्त्वाच्या लोकांशी चर्चा केली जाणार आहे आणि येत्या आठ दिवसात उमेदवार जाहीर केले जातील असे नितीन वाळके यांनी सांगितले.
     सिंधुदुर्ग ओबीसी व आरक्षित समाज महासंघामध्ये असलेल्या वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच आपले उमेदवार विधानसभा निवडणुकीत उतरविणार  असल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत नितीन वाळके याना विचारले असता ते म्हणाले, आम्ही राजकीय पादत्राणे बाहेर ठेवून ओबीसी महासंघाचे काम करत आहोत त्यामुळे तशी काही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट केले. तर हाच मुद्दा अधिक स्पष्ट करताना वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी सांगतले, ओबीसी आणि आरक्षित समाज ज्याठिकाणी निवडणुका लढेल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी थांबेल. त्यामुळे आम्ही ओबीसीं ,महासंघाच्या  उमेदवाराला प्राधान्य देऊ.
     दरम्यान जिल्ह्याची लोकसंख्या ८ लाख ५८ हजार आहे. त्यात ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजे यांनी बनलेल्या ५२ टक्के आरक्षित समाजामध्ये ५१० विविध समाजाच्या जाती-उपजाती आहेत. त्यातील १७० ते १८० जातीचे लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. त्यापैकी ८० ते ८५ समाजाच्या जिल्हा संघटना आहेत.  यामध्ये ६५ ते ७० समाजाच्या संस्था धर्मदाय आयुक्ताकडे नोंदणीकृत आहेत. जिल्ह्यात ५ लाख १० हजार ते ५ लाख १५ हजार एवढी लोकसंख्या आरक्षित समाजाची आहे.  यामध्ये वैश्य वाणी, भंडारी आणि गाबीत समाज १ लाखापेक्षा जास्त संख्येने आहे. ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामध्ये सुद्धा ओबीसी आणि आरक्षित समाज जास्त संख्येने आहे.अशी माहिती नंदन वेंगुर्लेकर यांनी दिली. यावेळी सिंधुदुर्ग ओबीसी  व आरक्षित समाज महासंघाच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदी ऍड. सिद्धार्थ भांबुरे यांची निवड झाल्याचे नितीन वाळके यांनी जाहीर केले.

You cannot copy content of this page