वेंगुर्ल्याची शेफाली खांबकर बनली पहिली ‘गल्फ सुपर शेफ‘ …!

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ल्याच्या शेफाली खांबकरला पहिली गल्फ सुपर शेफ होण्याचा बहुमान मिळाला आहे. रविवारी संध्याकाळी दुबईमध्ये झालेल्या एका ग्रँड सोहळ्यात तीन हजार स्पर्धकांमधून शेफाली खांबकरच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.


बिईंग मुस्कान आणि एस.व्ही.के.यांच्या माध्यमातून दुबईमध्ये पहिल्या गल्फ सुपर शेफ या अत्यंत मानाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये यु.ए.इ.मधील अनेक नामवंत शेफनी सहभाग घेतला होता. यू.ए.इ.च्या विविध भागातून तीन हजारहुन अधिक शेफ यात सहभागी झाले होते. गेले काही दिवस सेलिब्रिटी शेफच्या उपस्थितीत विविध फे-या मधून पहिल्या सर्वोत्तम बारा शेफची निवड करण्यात आली. सलग तीन दिवस विविध फे-यांमधून पाहिल्या टप्यात आठ आणि नंतर अंतिम तीन शेफची निवड करण्यात आली. पंचतारांकित पदार्थांपासून स्ट्रीट फूड अशा विविध फे-या जागतिक दर्जाच्या शेफकडून या स्पर्ध दरम्यान घेण्यात आल्या.
रविवारी ६ ऑक्टोबरला सायंकाळी दुबईमध्ये झालेल्या ग्रँड फिनाले मध्ये शेवटच्या तीन स्पर्धकांमध्ये शेफाली खांबकर निवडली गेली होती. या ग्रँड सोहळ्यात शेफाली खांबकर पहिली गल्फ शेफ बनल्याची घोषणा करण्यात आली.
सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्या हस्ते शेफाली हिला गल्फ शेफ ट्राॅफी, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. गल्फमध्ये झालेल्या या पहिल्या भव्यदिव्य स्पर्ध्येत अव्वल ठरत एका कोकणकन्येने गल्फ मधील या मानाच्या चषकावर आपले नाव कोराल्यामुळे तिचे विशेष अभिनंदन होत आहे. शेफाली वेंगुर्ल्यातील पाटकर हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.
गल्फमधील ही मानाची स्पर्धा जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना शेफालीने ‘माझ्यासाठी ही फार मोठी अचिव्हमेंट आहे. स्वप्न सत्यात उतरले आहे असा वाटतंय. अर्थात या सगळ्यात माझे पती चेतन किन्नरकर, सासूबाई यांचा सगळ्यात मोठा पाठिबा होता. कोकणातील तुलनेने छोट्या पण सुंदर शहरातून मला सतत पाठबळ देणा-या माझ्या आई, वडील, बहिणीमुळे इथे पर्यंत आले‘‘अशा भावना शेफालीने व्यक्त केल्या.
रविवारी दुबईमध्ये शेफालीच्या नावाची घोषणा झाल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. शेफाली वेंगुर्ल्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी सुरेंद्र उर्फ बाळू खांबकर आणि सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी संध्या खांबकर यांची कन्या आहे. शेफालीच्या या यशानंतर मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या या दोघांचे ही विशेष अभिनंदन केले जात आहे.
फोटोओळी – सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांच्या हस्ते शेफाली हिला गल्फ शेफ ट्राॅफी, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

You cannot copy content of this page