आमदार वैभव नाईक : मत्स्य आयुक्तांकडे केली तक्रार; मासळी चोरी प्रकरण
*💫मालवण दि.६-:* सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने सोमवारी पकडलेल्या गोव्यातील एलईडी पर्ससीनेट टॉलर वरील काही लाखो रुपयांची मासळी मत्स्यव्यवसाय विभागाच्या सुरक्षा रक्षकाने परस्पर लंपास केल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मत्स्य व्यवसाय विभागाने याबाबत संबंधित सुरक्षा राक्षकास नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. तर प्रकाराबाबत संतप्त झालेल्या आमदार वैभव नाईक यांनी थेट मत्स्य आयुक्तांकडे दूरध्वनीद्वारे तक्रार केली आहे. त्या सुरक्षा रक्षकाची चौकशी व्हावी, असे आदेश आम. आयुक्तांकडे दिले. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या शीतल या गस्ती नौकेने सोमवारी सकाळी वेंगुर्ला हद्दीतील शिरोडा समोर २० वाव खोल समुद्रात अनधिकृत रित्या गोवा येथील एलईडी टॉलर पकडला होता. या टॉलरवर बांगडे, बळा, काप अशी लाखो रुपयांची मासळी होती. मात्र कारवाईसाठी गेलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या एका सुरक्षा रक्षकाने यातील काही मासळी परस्पर रित्या लंपास करण्याचा प्रयत्न केला. याबाबत शिवसेना शहर प्रमुख बाबी जोगी यांनी याबाबत आपल्याकडे पुरावे असून संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करावी अशी मागणी मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली. शिवाय सोमवारी मालवण दौऱ्यावर असलेले आम. वैभव नाईक यांच्याकडेही तक्रार केली. परराज्यातील हायस्पीड टॉलर आणि एलईडी पर्ससीन टॉलर पकडल्यानंतर मत्स्य विभागासाठी कार्यरत असलेले काही सागरी सुरक्षा रक्षक टॉलर्सना मिळालेली मासळी परस्पर लंपास करत असल्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे जोगी यांनी आम. नाईक यांना सांगितले. यावर संतप्त झालेल्या आम. वैभव नाईक यांनी त्या सागरी सुरक्षा रक्षकाची तक्रार थेट मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे केली. चार दिवसांपूर्वी मत्स्य विभागाने पकडलेली रत्नागिरी साखरीनाटे येथील एक एलईडी नौका मत्स्य विभागाच्या ताब्यातून पळून गेली. याप्रकरणीही मत्स्य विभागाकडून सुरक्षा रक्षकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. एकूणच या सर्व प्रकारामुळे सुरक्षा रक्षकांच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून सध्या अनधिकृत मासेमारी रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी होत आहे. मात्र सुरक्षारक्षकाकडून मासळीची चोरी होणे हा प्रकार योग्य नाही. अशा प्रकारांमुळे मत्स्यव्यवसाय खात्याची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी संबंधितांवर मत्स्यव्यवसाय खात्याने कडक कारवाई करावी अशी मागणी श्री. जोगी यांनी केली आहे.
