⚡मालवण ता.०८-: मालवण- कसाल राज्यमार्गावर आनंदव्हाळ येथील रस्त्यावरील खडी उखडून ती रस्त्यावर पसरल्याने वाहतूकीस धोकादायक बनलेल्या या रस्त्याबाबत काल ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाने आनंदव्हाळ रस्त्यावरील उखडलेली खडी उचलण्याचे काम सुरु केले.
मालवणात डिसेंबर महिन्यात नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी कसाल मालवण रस्त्यावरील आनंदव्हाळ ते गोवेकर स्टॉप या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र पहिल्या पावसात हा रस्ता नादुरुस्त होऊन रस्त्यावरील खडी उखडून ती रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. तसेच या रस्त्यावर खडीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजित पाटील यांना जाब विचारला. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास येत्या १५ ऑगस्टला या रस्त्यावर जनआंदोलन करण्याचा इशारा हरी खोबरेकर आणि शिवसैनिकांनी दिल्यावर श्री. पाटील यांनी येत्या तीन चार दिवसात या रस्त्याची दुरुस्ती करण्याची ग्वाही दिली होती. ठाकरे शिवसेनेच्या या दणक्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आनंदव्हाळ रस्त्यावरील खडी उचलून रस्ता स्वच्छ करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. तसेच रस्ता दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
