ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्र ज्येष्ठांना दिलासादायक ठरेल…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण:मालवणात रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय केंद्राचे लोकार्पण..

मालवण (प्रतिनिधी)-:वृद्ध व्यक्तींना त्यांच्या उतार वयात अनेक आजरांचा सामना करावा लागत असतो, वृद्धांकडे तुटपुंजे पैसे असल्याने ते औषधे व उपचार कमी घेतात, अशा स्थितीत वृद्ध व्यक्तींचा वैद्यकीय अहवाल तयार होणे, त्यांच्या उपचारासाठी जेनेरीक मेडिसिन बँक निर्माण होणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनाच्या या काळात आरोग्य सेवेची असलेली गरज लक्षात घेऊन रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरने सुरु केलेले ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्र हा स्तुत्य उपक्रम असून हे केंद्र ज्येष्ठाना दिलासादायक ठरेल, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरमध्ये सुरु केलेल्या ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय सुश्रुषा, उपचार, पुनर्वसन, संशोधन केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते फलक अनावरण व फीत कापून करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व मालवण ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष दिघे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शहराध्यक्ष बाबा मोंडकर आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. रेडकर यांनी प्रास्ताविक करत ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्राच्या उभारणीमागचे उद्देश व या मार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधा याविषयी माहिती दिली. डॉ. रेडकर म्हणाले, सन २०११ साली रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर या संस्थेने नेरूर- कुडाळ येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आजोळ हा वृद्धापकाळात त्यांची वैद्यकीय काळजी सेवा देणारा उपक्रम सुरू केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्धांचे वास्तव्य जास्त असून यांचा मृत्यू दरही इतर जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. अंथरुणाला खिळलेले रुग्ण ज्यांची काळजी पेशंटचे जे नातेवाईक घरी घेऊ शकत नाहीत. अशा लोकांसाठी देखील रेडी येथे ट्रस्ट स्थापन सुरू करून त्यांच्यासाठी एक ट्रस्ट हॉस्पिटल संस्थेने सुरु केले आहे. ज्यामध्ये दिलासा आणि विसावा असे दोन पूर्णपणे समर्पित ज्येष्ठ नागरिक उपचार कक्ष कार्यरत आहेत. सध्या जिल्ह्यात वृद्धाश्रम आहेत. पण ज्येष्ठाना उपचार देणारे कुठलेही जिर्याट्रिक मेडिकल सेंटर आपल्या जिल्ह्यात रेडी हॉस्पिटल सोडल्यास नाही. त्यामुळे मालवण येथे संस्थेच्या हॉस्पिटलमध्ये नूतन वास्तुमध्ये डॉ. रेडकर कुटुंबीय जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक जिर्याट्रिक सेंटर (ज्येष्ठ नागरिक वैद्यकीय उपचार केंद्र) सुरू करत आहे, असेही डॉ. रेडकर म्हणाले. यावेळी डॉ. सुभाष दिघे यांनी या सेंटरच्या उभारणी बाबत समाधान व्यक्त करत एक स्तुत्य उपक्रम राबविला जात असल्याचे सांगितले.

यावेळी डॉक्टर फॅटर्नीटी क्लबतर्फे डॉक्टरांसाठी जिल्ह्यात मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर भवन उभारण्यासाठी भूखंड मिळावा, अशी मागणी पालकमंत्री चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावर ना. चव्हाण यांनी सदर जागेच्या मालकी हस्तांतरण बाबत काही तांत्रिक बाबी पूर्ण करावायच्या आहेत, मात्र तरीही सदर जागा डॉक्टर फॅटर्नीटी क्लबने जागा ताब्यात घेऊन भवनाचे काम सुरु करावे, असे सांगितले. डॉ. रेडकर यांनी ना.चव्हाण यांना निवेदन सादर करत राज्यात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी विशेष पॉलिसी तयार करावी यासह अन्य मागण्या केल्या. यावर ना. चव्हाण यांनी राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉलिसी असून त्यात त्यांच्या आरोग्य विषयक तरतुदीचा समावेश केला जाईल, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी केले. यावेळी सौ. सीमाली रेडकर, डॉ. सुप्रिया रेडकर, डॉ. राजेंद्र पाताडे, डॉ. सुहास पावसकर, डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. अजित लिमये, डॉ. राहुल वझे, डॉ. अविनाश झाट्ये, डॉ. मिलिंद कुळकर्णी, डॉ. शिल्पा झाट्ये, डॉ. मालविका झाट्ये, डॉ. शुभांगी जोशी, डॉ. रामचंद्र चव्हाण, डॉ. धनंजय सावंत, डॉ. परुळेकर, डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. अमोल झाट्ये, डॉ. राहुल पंतवालावलकर, डॉ. मेहंदळे आदी व इतर डॉक्टर्स, तसेच भाजपचे राजन तेली, धोंडी चिंदरकर, दीपक पाटकर, राजन वराडकर, संदीप परब, पूजा वेरलकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page