सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी आज राजन गणपत साळुंखे यांची निवड करण्यात आली. या संस्थेचे वेंगुर्ला मतदार संघातील संचालक श्री. भाग्यवंत वाडीकर यांच्या निवृत्तीनंतर संस्थेचे वेंगुर्ला तालुका मतदारसंघाचे पद जानेवारी महिन्यापासून रिक्त होते. यासाठी शनिवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकार यांनी संचालक पदासाठी निवडणूक घोषित केली होती. याकरिता राजन चौगुले यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. आज सर्व संचालकांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
संचालक पदासाठी राजन गणपत साळुंखे, न्यायालयीन कर्मचारी वेंगुर्ला व रामचंद्र विष्णू जाधव, पत्तन कार्यालय कर्मचारी वेंगुर्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राजन साळुंखे यांचे नाव संचालक दिनेश खवळे यांनी सुचविले तर संचालक प्रवीण सावंत यांनी त्याला अनुमोदन दिले. गुप्त मतदान पद्धतीने झालेल्या या मतदान प्रक्रियेत राजन साळुंखे यांना ११ मते तर रामचंद्र जाधव यांना ३ मते मिळाली. त्यामुळे राजन साळुंखे यांना निवडणूक निर्णय अधिकारी चौगुले यांनी विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.
नवनिर्वाचित संचालक राजन साळुंखे यांचे संस्थेचे अध्यक्ष राजन चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती अनघा तळावडेकर, संचालक वासुदेव वरवडेकर, कृष्णा आडणेकर, दिनेश खवळे, प्रवीण सावंत, सौ. वर्षा मोहिते, देविदास आडारकर, राजेंद्र शिंगाडे, अमित गंगावणे, वंदन गावडे, चेतन गोसावी, विलास चव्हाण बाळकृष्ण रणसिंग, सचिव निलेश कुडाळकर उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी राजन चौगुले यांचे संस्थेचे सचिव निलेश कुडाळकर यांनी आभार मानले.
