प्रेमचंद यांनी भारतीय साहित्याची दिशा बदलण्याचे कार्य केले…

प्रा. हंबीरराव चौगले: ज्येष्ठ साहित्यिक प्रेमचंद यांची जयंती साजरी..

मालवण (प्रतिनिधी)

हिंदी भाषा साहित्यातील प्रेमचंद यांच्या साहित्याचे वैश्विक महत्व आहे. प्रेमचंद यांनी वास्तववादी साहित्य लिखाण करून दीन, दलित, दुबळे, मजूर, कामगार, शेतकरी यांना आपल्या साहित्यातून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, प्रेमचंद यांनी भारतीय साहित्याची दिशा बदलण्याचे कार्य केले, असे प्रतिपादन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. हंबीरराव चौगले यांनी केले.

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या हिंदी विभागामार्फत हिंदी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, प्रमुख मार्गदर्शक हिंदी विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, स्टाफ सेक्रेटरी प्रा. के. के. राबते आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी मानवी जीवनाला दिशा देण्याचे काम साहित्यिकच करत असतात, देश निर्माण प्रक्रियेमध्ये साहित्यिकांचे महत्व मोठे आहे असे सांगत प्रेमचंद यांच्या साहित्याचा आढावा घेतला. त्यानंतर प्रा. के. के. राबते, ग्रंथपाल संग्रामसिंह पवार, डॉ.एम. आर. खोत, प्रा. रोहिणी फाटक यांनीही आपल्या मनोगतातून प्रेमचंद यांचे जीवन कार्य व साहित्य याविषयी विचार व्यक्त केले. तर डॉ. सुमेधा नाईक यांनी प्रेमचंद यांच्या साहित्यावर कविता सादर केली. यावेळी ज्योती जाधव, श्रावणी गावडे, मिसबाह काझी या विद्यार्थ्यांनीही प्रेमचंद यांच्याविषयी विचार मांडले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ अन्वेषा कदम यांनी केले. आभार विद्यार्थी राहुल जाधव याने मानले. या कार्यक्रमास हिंदी विभागातील आदित्य सावंत, मनाली तांबे यांच्यासह इतर विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.

You cannot copy content of this page