ऐश्वर्या काळूशे:कुडाळ मध्ये महसूल पंधरवडा शुभारंभ..
⚡कुडाळ ता.०१-: महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे,या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा महिलांनी लाभ घेऊन आप-आपल्या क्षेत्रात प्रगती साधावी व भविष्यात योजनांवर अवलंबून न राहता स्वकर्तृत्वावर उभे राहावे असे आवाहन कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी केले. यावेळी प्रातांधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आतापर्यंत प्राप्त प्रस्तावांची तपासणी सुरू करण्यात आली.
लोकाभिमुख कामाचा करूया निपटारा, चला करूया महसूल पंधरवडा साजरा.. अशी टॅग लावून घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पासून महसूल पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. आज महसूल दिनाचं औचित्य साधून कुडाळ तहसील कार्यालयात या शुभारंभ सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. कुडाळच्या उप विभागीय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. या महसूल पंधरवड्यात प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत आणि १५ ऑगस्टला याची सांगता होणार आहे. यावेळी कुडाळ नायब तहसिलदार संजय गवस, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री.चव्हाण, नायब तहसिलदार प्रदिप पवार, श्री. पिळणकर, एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अधिकारी गीता चेंदवणकर, कुडाळ न.पं.चे मुख्याधिकारी अरविंद नातु, सखी वन्स स्टॉप सेंटरच्या रुपाली प्रभु, अक्षय कानविंदे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी श्रीमती काळुशे म्हणाल्या की, प्रत्येकाचा महसूल विभागाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असतो. तुमची सर्वांची साथ असेल तर निश्चितच आमचा महसूल विभाग अप्रतिम काम करेल. आता मुख्यमंत्री लाडकी योजनेच्या अर्जाची तपासणी सुरू होणार आहे. अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. दि. 31 ऑगस्टपर्यत अधिकाधिक महिलांचे अर्ज भरुन घेण्यासाठी आमची सर्व यंत्रणा काम करत राहणार आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी आपण काय करतो? दिवस रात्र आपण काम करतो. तरी सुध्दा आपल्याला प्रत्येक वेळी आई- वडिल किंवा शासनाची मदत का घ्यावी लागते? आपण स्वतःला कमकुवत समजतो का? ज्या महिला चांगल्या प्रकारे शिकतात, काम करतात त्यांचे निश्चितच कौतुक आहे. पण ज्या काहीच करत नाहीत त्या महिलांनी आतापासूनच स्वतःच्या प्रगतीसाठी काम करा. स्वतः सक्षम व्हा. प्रत्येक महिलेने आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. प्रशासन आणि आमचे निश्चितच तुम्हाला कायम सहकार्य राहिल. असा विश्वास श्रीमती काळुशे यांनी उपस्थित महिला भगिनींन समोर व्यक्त केला.
यावेळी संजय गवस म्हणाले की, शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे. या योजनेतून एकही महिला वंचित राहू नये त्यासाठी आमचे काम सुरू आहे. आजच्या महसुल दिनाच्या निमित्ताने या योजनेत प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी सुरू झाली आहे. महिलांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी या योजनेबाबत पंचायत समिती प्रशासन कार्यरत असल्याचे सांगून अधिकाधिक महिलांना लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे सांगितले. सखी वन्स स्टॉपच्या रुपाली प्रभु यांनी महिलांना कुटूंबातून कुणी असहकार्याची भुमिका घेत असेल तर त्या महिलांनी आपल्या विभागाशी किंवा वन्स स्टॉपच्या 181 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन केले. एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या अक्षय कानविंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. दरम्यान येत्या पंधरावड्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना, स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय,कृषी मार्गदर्शन कार्यक्रम,शेती पाऊस आणि दाखले,युवा संवाद, महसूल इ प्रणाली आदि विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे जाहिर केले. यावेळी स्वप्नाली सावंत,रसिका बांबुळकर या दोन युवतींना प्रातिनिधिक स्वरूपात दाखल्यांचे वाटप प्रांताधिकारी श्रीमती काळुशे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन व आभार अव्वल कारकुन नरेश ऐडगे यांनी मानले.
महसुल पंधरावडा कार्यक्रमाच्या दरम्यान प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी उपस्थित अंगणवाडी सेविकांना लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरताना काही अडचणी उद्भवतात का? याबाबत विचारणा केली. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरताना काही महिलांच्या जन्म तारखा वेगवेगळ्या आहेत. काही घटस्पोटीत महिला आहेत. काही महिलांना पती कागदपत्र देत नाहीत. एक महिला तर नेपाळची आहे. बर्याच महिलांच्या बँक पासबुकची प्रिंट अस्पष्ट दिसत आहे. अशा एक ना अनेक समस्या उद्भवत असल्याचे सांगितले. या सर्व समस्यांचे प्रशासन आपल्या स्तरावर कार्यवाही करून अधिकाधिक महिलांना लाभ कसा मिळेल यासाठी प्रयत्न करेल असा विश्वास श्रीमती काळुशे यांनी व्यक्त दिला.
