आमदार दीपक केसरकर:गुरुपौर्णिमेनिमित्त निवासस्थानी साई पादुकांचे पूजन..
सावंतवाडी : गुरुपौर्णिमेच्या निमीत्ताने सालाबादप्रमाणे प्रतिशिर्डी येथील श्री साई पालखी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी आली. यावेळी आम. दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्याहस्ते साई पादुकांचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी श्री. केसरकर यांना पुन्हा मंत्रीपद मिळो असं गाऱ्हाणं घातलं.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, साईबाबांनी न मागता सर्वकाही दिल आहे. चार वेळा आमदार झालो, मंत्री झालो, लोकांच प्रेम कमावलं. आज त्या लोकांसाठीचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यावर माझा भर आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं शपथपत्र गुरुवारी सादर होणार असून तो प्रश्न मार्गी लागणार आहे. आजच्या दिवशीच त्याबाबत भोगले घराण्याशी बोलण झालं. तर मंत्रीपद मिळावं अशी इच्छा कार्यकर्त्यांची असून एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेऊ शकतात अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयास देखील विभागात आज दुसरा क्रमांक मिळाला असून २०० बेडच सर्वोत्कृष्ट रूग्णालय भविष्यात ठरेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. गुरूपौर्णिमेला शिर्डीत साईंच दर्शन घेतल्यानंतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी दर्शन घेणार आहे. पक्षाचे नेते एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रेरणा घेत हिंदुत्वाच्या गुरूना नमन करणार आहे. राजकारणात विचारधारेला महत्व असून बाळासाहेब ठाकरे यांनी ही विचारधारा भारताला दिली. त्यामुळे एक बलाढ्य राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, ज्येष्ठ नेते अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, शहरप्रमुख बाबु कुडतरकर, महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, सुधा कवठणकर आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
