⚡सावंतवाडी ता.२९-: फिटनेस योग फाऊंडेशन महाराष्ट्र अंतर्गत चालविलेल्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिरामध्ये आज गुरुपौर्णिमा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा महोत्सव जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे 29 जुलै 2026 रोजी सकाळी 5:30 वाजता आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात महर्षी व्यास मुनी, महर्षि पतंजली, आदि योगी भगवान शिव आणि परम पूज्य स्वामी रामदेव बाबांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व सामूहिक प्रार्थने झाली. यावेळी उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी गुरुंच्या चरणी श्रद्धासुमने अर्पण केली. याप्रसंगी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व, योगातील गुरूंचे स्थान आणि जीवनात गुरूंची भूमिका यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सामूहिक योग, प्राणायाम व ध्यानधारणा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. अनेक योगसाधकांनी आपापली मनोगते व्यक्त केलीत. याप्रसंगी योग शिक्षक शेखर बांदेकर, फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रसिका सावंत, सावंतवाडी नगरसेविका सौ. सीमा नाईक, हिरकणी वस्तीस्तर संघाच्या अध्यक्षा सौ. प्रगती बामणे यांच्यासह प्रशिक्षणार्थी आणि योगसाधक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आसपासच्या गावांतील अनेक योगाभ्यास प्रेमींनी या विशेष महोत्सवात सहभाग दर्शविला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फिटनेस योग फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
