Headlines

रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बांदा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

⚡बांदा ता.२८-:
भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून बांदा गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला महिला जिल्हा मोर्चा अध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, बांदा शहराध्यक्ष निलेश नाटेकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, श्यामसुंदर मांजरेकर, तनुजा वराडकर, बूथ अध्यक्ष निलेश देसाई, निलेश उर्फ पापू कदम, शैलेश केसकर, साई सावंत, राकेश केसरकर, हेमंत दाभोलकर, स्मिता पेडणेकर, बाबा काणेकर तसेच वाफोली ग्रामपंचायत सदस्य अमित कळंगुटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करताना सौ. श्वेता कोरगावकर यांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करण्याचे, शिक्षणातूनच उज्ज्वल भविष्य घडते हे लक्षात ठेवून सातत्याने मेहनत घेण्याचे आवाहन केले. “आजची मेहनतच उद्याच्या यशाचा पाया आहे. मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली. वह्यांचे वितरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी स्वागत करत भारतीय जनता पार्टीच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.

You cannot copy content of this page