Headlines

पावसाच्या खंडामुळे भातपिकाच्या नुकसानीचा आढावा; बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रशासनाचे नियोजन

सिंधुदुर्ग, दि. २१ : जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने घेतलेल्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा तसेच भातपिकाच्या नुकसानीचा पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. काही भागात भातपीक करपण्याच्या घटना निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत व उपाययोजना उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, कृषी उपसंचालक ज्ञानेश्वर बढे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सावंतवाडी, वेंगुर्ला आणि वैभववाडी तालुक्यांत भातपिकाच्या नुकसानीची प्रकरणे प्रशासनाकडे प्राप्त झाली आहेत. या नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून आवश्यक त्या उपाययोजनांचे नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध विकासकामे आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. उपलब्ध निधीचा प्रभावी व वेळेत विनियोग करण्यासोबतच विकासकामांची गुणवत्ता कायम राखण्याच्या दृष्टीने प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे, यावरही बैठकीत चर्चा झाली. दर आठवड्याला अमलबजावणी यंत्रणांचा आढावा जिल्हा नियोजन अधिकारी यांनी घ्यावा असेही त्यांनी सांगितले.

०००००

You cannot copy content of this page