श्री गणरायाची विधिवत पूजा व आरती करून घेतले दर्शन
सावंतवाडी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सावंतवाडी तालुक्यातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विविध मंडळांमध्ये विधिवत पूजा करून गणरायाची आरती केली.
सावंतवाडी शहरातील चितारआळी, सावंतवाडी पोलीस ठाणे, सालईवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच सालईवाडा भट्टीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सवाला ना. नितेश राणे यांनी भेट दिली. यावेळी उपस्थित गणेशभक्त, मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
त्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील सार्वजनिक गणेशोत्सवालाही भेट दिली. बांद्याच्या बाप्पाचे दर्शन घेत विधिवत पूजा व आरती केली. यावेळी गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीभावासोबतच सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य होत असल्याचे यावेळी दिसून आले.
गणेशोत्सवानिमित्त विविध सार्वजनिक मंडळांना भेटी देत असताना पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताचा त्यांनी स्वीकार केला. या दर्शन दौऱ्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, लखमराजे भोसले, तालुका मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, न. प. सभापती सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, मोहिनी मडगांवकर, दिपाली भालेकर, नगरसेवक ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सुकन्या टोपले, दुलारी रांगणेकर, मनोज हवालदार, राघवेंद्र चितारी, दिलीप भालेकर, मेघना साळगांवकर, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, भाजपा शहराध्यक्ष निलेश नाटेकर, माजी अध्यक्ष बाबा काणेकर, वाफोली उपसरपंच विनेश गवस, गुरुनाथ सावंत, शैलेश केसरकर, माजी सरपंच दीपक सावंत, सोहम सावंत, साई धारगळकर, राकेश केसरकर यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
