मातीच्या २१ गोळ्यांपासून दरवर्षी मूर्ती निर्मिती:पिढ्यान्पिढ्या जपली जातेय आगळीवेगळी परंपरा..
⚡कणकवली ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या कणकवली शहरातील टेंबवाडी येथील ‘संतांचा गणपती’ हा भक्तांच्या श्रद्धेचे आणि परंपरेचे अनोखे प्रतीक ठरला आहे. संत पायाजी बाळाजी सावंत यांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाची परंपरा आजही सावंत कुटुंबीयांसह कणकवलीतील भाविक आणि नागेश्वर मित्रमंडळाचे कार्यकर्ते श्रद्धेने जपत आहेत. कणकवलीचे भूषण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गणरायाच्या आगळ्या वैशिष्ट्यांमुळे गणेशोत्सवाच्या काळात टेंबवाडी परिसर भक्तिरसाने भारावून जातो.
‘संतांच्या गणपती’चे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या गणेशमूर्तीची निर्मिती दरवर्षी मातीच्या २१ गोळ्यांपासून केली जाते. टेंबवाडी येथील सावंत कुटुंबीयांच्या श्री गणेश मंदिरातच मूर्ती तयार केली जाते. कणकवली शहरातील बालगोपाळ आणि स्थानिक मंडळी आपल्या कलानैपुण्यातून ही मूर्ती साकारतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा-अर्चा करून या गणरायाची स्थापना केली जाते आणि त्यानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत विविध धार्मिक विधी आणि सेवांमधून गणरायाची आराधना केली जाते.
संत पायाजी सावंत यांची भक्तीमय परंपरा
संत पायाजी बाळाजी सावंत हे सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचे मूळ रहिवासी होते. ते विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. पायी चालत पंढरपूरची वारी करणे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. पंढरपूरच्या वारीदरम्यान कणकवली बसस्थानकाशेजारील सोनगेवाडी येथे त्यांचा मुक्काम होत असे. यावेळी त्यांच्या कीर्तन आणि प्रवचनाचा लाभ परिसरातील भाविकांना मिळत असे.
संत पायाजी सावंत यांच्या भक्तीमय कार्याने प्रभावित झालेल्या कणकवलीतील राणे (पटेल) तसेच इतर गावकऱ्यांनी त्यांना टेंबवाडी येथे वास्तव्य करण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करून त्यांनी टेंबवाडी येथे वास्तव्य केले. पुढे प. पू. साटम महाराज यांच्या सांगण्यावरून संत पायाजी सावंत यांनी टेंबवाडी येथे श्री गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून हा गणपती ‘संतांचा गणपती’ म्हणून प्रसिद्ध झाला.
लाल रंगातील गणेशमूर्ती हे प्रमुख वैशिष्ट्य
‘संतांच्या गणपती’ची मूर्तीही आपल्या रंगरूपामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. संपूर्ण शरीराला लाल रंग, पिवळे वस्त्र, डोक्यावर सोनेरी मुकुट आणि कानावर पोपट अशी या गणरायाची आकर्षक मूर्ती असते. लाल रंगातील ही मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरते.
‘भांग’ अर्थात ‘सब्जी’चा प्रसाद
‘संतांच्या गणपती’च्या उत्सवातील आणखी एक आगळी परंपरा म्हणजे भाविकांना दिला जाणारा ‘भांग’ हा प्रसाद. दुधामध्ये विविध साहित्य घालून तयार करण्यात येणाऱ्या या प्रसादाला ‘सब्जी’ असेही संबोधले जाते. त्यासोबत करंजीचा प्रसादही भाविकांना दिला जातो. पिढ्यान्पिढ्या जपली गेलेली ही परंपरा आजही कायम आहे.
खांद्यावरून विसर्जनाची परंपरा
‘संतांच्या गणपती’ची विसर्जन मिरवणूकही तितकीच वैशिष्ट्यपूर्ण असते. मोठ्या लाकडी मंचकावर विराजमान झालेल्या गणरायाला पारंपरिक पद्धतीने खांद्यावरून घेऊन जाण्याची परंपरा आजही कायम आहे. वाहतुकीची आधुनिक साधने उपलब्ध असतानाही भाविक कोणत्याही वाहनाचा वापर न करता लाकडी मंचकासह गणेशमूर्ती जानवली नदीवरील गणपती विसर्जनस्थळी घेऊन जातात.
कणकवलीतील गणेशोत्सवाच्या वैभवात ‘संतांचा गणपती’ आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून आहे. भक्ती, श्रद्धा, परंपरा आणि स्थानिक कलाविष्काराचा संगम असलेला हा गणराय कणकवलीच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे जतन करणारा ठरला आहे.
