Headlines

बांदा–बोरिवली व बांदा–ठाणे एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी

जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांचे कणकवली आगार व्यवस्थापकांना निवेदन; परिवहन मंत्र्यांनाही ई-मेलद्वारे पाठपुरावा

बांदा/सकाळ वृत्तसेवा
गोवा सीमेवरील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि वाहतूक केंद्र असलेल्या बांदा येथून मुंबईकडे धावणारी बंद झालेली बांदा–बोरिवली एसटी बस सेवा तात्काळ पूर्ववत सुरू करावी, तसेच बांदा–ठाणे थेट एसटी बस सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कणकवली आगार व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी आगार व्यवस्थापक निवास कदम यांना निवेदन सादर करण्यात आले. तसेच राज्याचे परिवहन मंत्री यांनाही ई-मेलद्वारे निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, बांदा परिसरातील इन्सुली, डेगवे, वाफोली, कास, निगुडे, शेर्ले, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, मोरगाव, पडवे, माजगाव, विलवडे, मडुरा आदी गावांतील नागरिक दैनंदिन व्यवहारासाठी बांदा येथे येत असतात. या परिसरातील हजारो चाकरमानी मुंबई, ठाणे, बोरिवली व उपनगरांमध्ये वास्तव्यास असून गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, नागपंचमी, दिवाळी तसेच इतर सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर गावाकडे ये-जा करतात. अशा वेळी एसटी महामंडळाची थेट बस सेवा ही सुरक्षित, विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांना परवडणारी वाहतूक व्यवस्था ठरते.
पूर्वी सुरू असलेल्या बांदा–बोरिवली बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आणि समाधानकारक प्रवासी भारमान असूनही कोणतेही ठोस कारण न देता ती सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण तसेच चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या प्रवाशांना सावंतवाडी, कणकवली किंवा कुडाळ येथे जाऊन बस पकडावी लागत असल्याने अतिरिक्त वेळ, आर्थिक खर्च आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच बांदा–ठाणे थेट बस सेवेलाही मोठी मागणी असून ती सुरू झाल्यास मुंबई महानगर परिसरात प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. विशेषतः सणासुदीच्या काळात खासगी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडे आकारले जात असल्याने सामान्य प्रवाशांवर आर्थिक भार पडतो. त्यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा–बोरिवली सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याबरोबरच बांदा–ठाणे बस सेवा सुरू करावी, तसेच प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आवश्यक त्या अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्यासह कासचे सरपंच प्रवीण पंडित, सागर राणे, संतोष राणे आदी उपस्थित होते. निवेदनाची दखल घेऊन प्रवाशांच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
फोटो:-
कणकवली आगार व्यवस्थापक निवास कदम यांना निवेदन देताना नितीन राऊळ, प्रवीण पंडित व इतर.

You cannot copy content of this page