वीज ग्राहक संघटना घेणार महावितरणच्या सीएमडी आणि स्वतंत्र डायरेक्टर यांची भेट…

जिल्ह्यात बैठक आयोजित करण्याची करणार मागणी..

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या दुरवस्थेबाबत जिल्हा वीज ग्राहक संघटना महावितरणचे सिएमडी लोकेश्चंद्र आणि स्वतंत्र डायरेक्टर श्री. पाठक यांची उद्या मुंबई येथे भेट घेणार आहे. जिल्हाध्यक्ष श्रीराम शिरसाट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी वरिष्ठांनी जिल्ह्यात येऊन महावितरण व वीज ग्राहक संघटना, तसेच सरपंच संघटना, वीज ग्राहक आदींसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात येणार आहे.


श्रीराम शिरसाट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणच्या वीज वितरणाचे खरे स्वरूप जिल्ह्यात गेले १५ दिवस सुरू असलेल्या पावसात उघड झाले असून जवळपास जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जनता चार पाच दिवस अंधारात होती. जिल्ह्यातील या दुरवस्थेबाबत महावितरणच्या जिल्ह्यातील वीज ग्राहक संघटना सिंधुदुर्ग गेली दोन वर्षे सातत्याने जिल्ह्यातील महावितरण व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत असून काही अंशी वगळता जिल्ह्याच्या वीज वितरणाचा पायाच ढासळलेला असल्याने म्हणावे तसे यश येत नाही. परिणामी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ उद्या सोमवार दिनांक २९ जुलै २०२४ रोजी महावितरणचे मुख्य कार्यालय असलेल्या प्रतापगड, बांद्रा येथे महावितरणचे सीएमडी लोकेशचंद्र यांची तर फोर्ट मुंबई येथे महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री.पाठक यांची भेट घेऊन जिल्ह्यातील वीज वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी वरिष्ठांनी जिल्ह्यात येऊन महावितरण व वीज ग्राहक संघटना, तसेच सरपंच संघटना, वीज ग्राहक आदींसोबत संयुक्त बैठक आयोजित करावी अशा विविध मागण्यांचे निवेदन सादर करणार आहे.
गेले १५/२० दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले आहे. यावेळी मुळातच कुमकुवत असलेल्या, ढासळलेल्या महावितरणच्या वीज पुरवठ्याचे बारा वाजले असून याला जबाबदार आहेत ते केवळ महावितरणचे कामचुकार अधिकारी आणि व्यवस्था. जिल्ह्याला वीज वितरण करणारी जुनाट यंत्रणा, सडलेले पोल, ठिकठिकाणी जोड दिलेल्या वाहिन्या आणि मरणासन्न अवस्थेत असलेले ट्रान्सफॉर्मर यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले असून अधिकाऱ्यांनी एप्रिल मे महिन्यात करावयाची मान्सून पूर्व कामे न केल्याने पावसाळ्यात झाडे तुटून यंत्रणा खराब होणे, महावितरणचे पर्यायी जनतेच्या पैशांचे नुकसान होणे, आणि जिल्हा काळोखात राहणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे आवश्यक तिथे सबस्टेशन उभारणी करणे, जिल्ह्यातील उद्योग व्यवसायांना मागणी प्रमाणे वीज जोडणी देणे, महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात येऊन जिल्ह्याच्या वीज व्यवस्थेचा आढावा घेणे, जिल्हा तथा तालुका वीज ग्राहक संघटना, सरपंच संघटना आदिंसोबत संयुक्त बैठक घेऊन वीज वितरण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी उपाययोजना करणे, जिल्ह्यातील काही जनतेशी उर्मट, उद्दामपणाने बोलतात अशा कामचुकार अधिकाऱ्यांची तात्काळ जिल्ह्यातून उचलबांगडी करणे अथवा निलंबित करणे आदी मागण्यांचे निवेदन प्रतापगड बांद्रा येथील मुख्य कार्यालयातील महावितरणचे सीएमडी लोकेशचंद्र यांना त्याचप्रमाणे फोर्ट मुंबई येथील महावितरणचे स्वतंत्र संचालक श्री पाठक यांना देणार आहेत. यावेळी ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्या दुपारी मुंबई बांद्रा येथील महावितरणच्या प्रतापगड कार्यालयात दुपारी ३.०० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page