Headlines

व्ही. एन. नाबर प्रशालेत गुरूवंदनेने गुरूपौर्णिमा सोहळा संपन्न…

बांदा/प्रतिनिधी
माणसाच्या जीवनात गुरूला अनन्यसाधारण महत्त्व असून, शिक्षकांना वैदिक काळापासून गुरूचे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, असा संदेश बांदा येथील व्ही. एन. नाबर प्रशालेत उत्साहात साजऱ्या झालेल्या गुरूपौर्णिमा सोहळ्यात देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी जगतगुरू व्यासमुनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच ज्यांच्या नावाने विद्यालय ओळखले जाते त्या विश्राम नृसिंह (व्ही. एन.) नाबर सरांच्या प्रतिमेलाही पुष्पहार अर्पण करून त्यांचे शैक्षणिक योगदान व मार्गदर्शन यांचे स्मरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी मनोगते सादर केली. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’ हे गीत सादर करून गुरूवंदना केली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प व भेटकार्ड देऊन आशीर्वाद घेतले.
सौ. स्नेहा नाईक यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन करताना आई-वडील व आयुष्यातील सर्व गुरूंचे उपकार कधीही विसरू नयेत, असे सांगितले. उपमुख्याध्यापिका सौ. शिल्पा कोरगावकर यांनी विद्यार्थ्यांनी गुरूंबद्दल कायम आदर बाळगून आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास यश निश्चित मिळते, असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी सप्तर्षींची माहिती देत जीवनातील गुरूंचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी सेजल सावंत हिने केले, तर आभार ऋतुराज नाईक याने मानले. गुरूपौर्णिमेनिमित्त प्रशालेचे विद्यार्थी विरांश परब व विदुला परब यांनी श्री दत्तगुरूंची मूर्ती शाळेला भेट दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
फोटो:-
बांदा येथील नाबर प्रशालेत गुरुपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page