कुडाळच्या एसआरएम कॉलेज मध्ये मुंबई विद्यापीठाची आविष्कार कार्यशाळा संपन्न…

⚡कुडाळ ता.२८-: संशोधनाची गरज ओळखून संत राऊळ महाराज महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची दृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. डॉ. ए.एन. लोखंडे यांनी केले. संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने १९ वी जिल्हास्तरीय अविष्कार कार्यशाळा शनिवारी महाविद्यालयामध्ये संपन्न झाली. त्यावेळी डॉ. लोखंडे बोलत होते.


क. म. शि. प्र. मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चव्हाण या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. लोखंडे यांनी तसेच आविष्कार स्पर्धेसाठी मार्गदर्शन व सहकार्य करून संशोधक विद्यार्थी घडविण्यास महाविद्यालय सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात अविष्कार स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचा मोलाचा वाटा असेल याची ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली. आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळेच्या प्रमुख वक्त्या तथा मुंबई विद्यापीठ, विकास कक्षाच्या ओ.एस.डी. डॉ. मिनाक्षी गुरव यांनी कार्यशाळेत उपस्थित असलेल्या जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर आविष्कार स्पर्धेचे नियम व स्वरूप स्पष्ट केले. तसेच संशोधन करण्यासाठी आवश्यक विचारसरणी कशी विकसित करावी याविषयी मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कोणत्याही समस्येकडे समस्या म्हणून न बघता त्याच्या निराकरणाकडे पाहिल्यास वेगवेगळ्या संशोधनाच्या कल्पना कशा सुचतात हे साधार पटवून दिले. डॉ. शशी मेनन यांनी आपल्या व्याख्यानातून त्यांच्या ‘गोधडी’ या उपक्रमाचे विश्लेषण केले व संशोधनाचा उगम हा प्रश्नातून कसा होतो हे समजावून सांगितले.
डॉ. सुनिता शैलजा यांनी त्यांच्या ‘लाजरी’ या झाडावर केलेल्या संशोधनाबद्दल मुलांना समजावून सांगितले व त्यातून संशोधनाच्या नवनवीन दिशा कशा तयार होऊ शकतात हे सांगितले आणि आपल्या संशोधनासाठी ठाम भूमिका घेण्याचे महत्त्व पटवून दिले.
यासोबतच या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध विषय देऊन त्यावर प्रात्यक्षिक स्वरूपात भित्तीचित्रे व सादरीकरण कसे करावे या संदर्भातही मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचा प्रारंभ वृक्षास पाणी घालून करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. पी. डी. जमदाडे यांनी केले. तद्नंतर अविष्कारचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर शिरसाट यांनी या स्पर्धेचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि पुढील स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभागाची अपेक्षा व्यक्त केली. सहसमन्वयक डॉ. उमेश पवार व जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. एन. आर. काळे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. के. एम. चव्हाण यांनी केले. या कार्यशाळेसाठी प्रा. बी. ए. चव्हाण, प्रा. के. ए. कुबल, प्रा. एस. आर. चौगुले, प्रा. पी. एम. तेंडुलकर आदींनी संशोधन विकास कक्षातील सदस्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य दिले. गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. एस. टी. आवटे उपस्थित होते.

You cannot copy content of this page