जनतेला वेठीस धरणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही…

मंगेश तळवणेकर: कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन करायच असेल तर काळ्या फिती लावून आंदोलन करावे..

⚡सावंतवाडी ता.२५-: उर्मटपणाचे वर्तन करणाऱ्या एका कर्मचाऱ्यासाठी संपूर्ण महसुल विभागाने सर्वसामान्य गरीब जनतेला वेठीस धरणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यासाठी जर कामबंद आंदोलन करायचेच असेल तर काळ्या फिती लावून आंदोलन करावे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांचे, महिला भगिनींचे कागदपत्रांविना होणारे हाल थांबतील असं मत माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी व्यक्त केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच लक्ष त्यांनी वेधल आहे.

ते म्हणाले, महसुल विभागाने 29 जुलै 2024 पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे मुलांचे वेगवेगळे दाखले, माझी लाडकी बहीण योजना दाखले, ज्यांची रेशनकार्ड नाहीत त्यांची नवीन रेशनकार्ड बनविणे, संजय गांधी योजनेची 30 जुलै पर्यंत आधारकार्ड न दिल्यास त्यांचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत. या योजना रखडून गोरगरीब तसेच सर्वच स्तरातील लोकांना यांचा फटका बसणार आहे. कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाशी उद्धट, उर्मटपणाचे वर्तन करणाऱ्या एका कर्मचाऱ्यासाठी संपूर्ण महसुल विभागाने सर्वसामान्य गरीब जनतेला वेठीस धरणे नैतिकदृष्ट्या कदापी योग्य होणार नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यासाठी जर कामबंद आंदोलन करायचेच असेल तर कामबंद न करता काळ्या फिती लावून आंदोलन करण्याचे निर्देश द्यावेत. जेणेकरुन सर्वसामान्य जनतेचे, विद्यार्थ्यांचे, महिला भगिनींचे हाल थांबतील अशी मागणी जिल्हाधिकारी यांना माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page