बबन साळगावकरांचं भर पावसात घंटानाद आंदोलन; पोलिसांमार्फत नोटीस पाठवून माझा आंदोलन दडपण्याच केसरकरांनी केला प्रयत्न..
⚡सावंतवाडी ता.१८-: मला आमदार बदलायचा आहे,असे घोषवाक्य घेऊन मी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढून केसरकर यांचा पराभव करणार आहे. त्याशिवाय सावंतवाडी मतदारसंघाचा विकास होणार नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिला. दरम्यान गेल्या पंधरा वर्षात मंत्री दीपक केसरकर यांनी जनतेच्या विकासाच्या नावाखाली स्वतःचा विकास करून हजारो कोटीची मालमत्ता जमा केली आहे. २०१७ मध्ये एसटी स्टँडचे भूमिपूजन होवूनही अद्याप देखील काम पूर्ण होऊ शकलेले नाही, याला जबाबदार केसरकर आहेत. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी हे घंटानात आंदोलन करत असल्याचे देखील श्री साळगावकर यावेळी बोलताना म्हणाले. श्री साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली आज महा विकास आघाडीच्या माध्यमातून एसटी स्टँड परिसरातील दुरवस्थेबाबत आज केसरकर यांच्या विरोधात घंटानात आंदोलन करण्यात आले. यावेळी केसरकर यांचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
ते पुढे म्हणाले माझे आंदोलन दडपण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे यश आले नाहीत. त्यामुळे त्यांनी मला काल सायंकाळी उशिरा पोलिसांमार्फत नोटीस पाठवून माझे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत होते, मात्र मी त्यांच्या नोटिसाला कुठेही घाबरलेला नसून मी माझे आंदोलन आज कोणत्याही परिस्थितीत केले. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत केसरकरांना घरात बसवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. केसरकर यांचा मी धिक्कार करतो अशा शब्दात साळगावकर यांनी केसरकर यांच्यावर हल्लाबोल केला.
