Headlines

वेंगुर्ला येथे 23 नोव्हेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिर

वेंगुर्ला
शेतीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाची माहिती शहरी भागातील महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या पुढाकाराने वेंगुर्ला नगरपरिषद व अनुलोम संस्थेच्या सहयोगाने सोमवार दि. २३ नोव्हेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात होणार आहे.
शहरातील अनेक महिलांचा शेतीशी प्रत्यक्ष संबंध असतो. काही महिलांच्या कुटुंबाची शेती ग्रामीण भागात असते, तर काही महिला स्वतः शेतीची कामे तसेच शेतीपूरक व्यवसायांमध्ये सहभागी असतात. मात्र, शहरी भागात वास्तव्यास असल्यामुळे किंवा जमिनीचा सातबारा उतारा स्वतःच्या नावावर नसल्यामुळे त्यांची शेतकरी म्हणून अधिकृत नोंद झालेली नसते. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्राच्या माध्यमातून शेतकरी म्हणून ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या प्रमाणपत्रासाठी महिलेच्या स्वतःच्या नावावर सातबारा उतारा असणे बंधनकारक नसून प्रत्यक्ष शेती किंवा शेतीपूरक कामांमध्ये सहभागी असलेल्या महिलांनाही नोंदणीची संधी आहे. त्यामुळे वेंगुर्ला शहरात राहणाऱ्या आणि शेतीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या महिलांनीही या उपक्रमाची माहिती घेऊन लाभ घ्यावा, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करताना अर्जदार महिलेचे आधारकार्ड आणि आधारशी संलग्न असलेला सक्रिय मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. अर्जामध्ये गाव, तालुका, जिल्हा आणि ग्रामपंचायतीचा तपशील तसेच महिला करीत असलेल्या शेती व शेतीपूरक कामांची माहिती भरावी लागणार आहे. कुटुंबातील जवळच्या सदस्याकडे फार्मर आयडी असल्यास त्याचा क्रमांकही देता येतो. या ऑनलाइन प्रक्रियेत स्वतंत्र कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नसून आधार ई-केवायसीसाठी संमती आणि स्वयंघोषणापत्राची प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
या प्रमाणपत्रामुळे महिलांची शेतकरी म्हणून अधिकृत नोंद होण्यास मदत होणार असून, कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
वेंगुर्ला शहरातील शेतीशी संबंधित असलेल्या महिलांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिकाधिक महिलांनी सोमवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, वेंगुर्ले नगरपरिषद येथे उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला नगरपरिषद व अनुलोम संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page