पूजा जोगी यांच्याकडून या घटनेचा तीव्र निषेध…

मालवण दि प्रतिनिधी
काँग्रेस नेत्या आणि खासदार सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्रावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लिहिलेल्या काही मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजप आणि एनडीएने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर, शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या पत्रकार परिषदेत निषेध व्यक्त करत असताना शिंदे गटाच्या नेत्या व प्रवक्त्या शायना एनसी यांच्या हातून दिवंगत शिवसेनाप्रमुख प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या घटनेमुळे आता राज्यभरात नव्या वादाला तोंड फुटले असून, विरोधकांनी शिंदे गटावर टीकेची झोड उठवली आहे.
सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी करण्यात आलेल्या उल्लेखावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची रणनीती शिंदे गटाकडून आखण्यात आली होती. त्यानुसार, या पुस्तकाचा निषेध नोंदवण्यासाठी शिंदे सेनेच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निषेध व्यक्त करत असताना पुस्तकातील पाने फाडण्याचे कृत्य सुरू होते. याच गडबडीत आणि घाईगडबडीत निषेध नोंदवत असताना शिंदे गटाच्या नेत्या शायना एनसी यांच्या हातून सोनिया गांधी यांच्या पुस्तकासोबतच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला भागच फाडला गेला.
ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि फोटोंचा मान राखून शिंदे गट राजकारण करतो, त्यांच्याच प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेबांचा फोटो फाडला गेल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करताना शिवसेना ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख पूजा जोगी यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रवक्त्यांनी ज्या प्रकारे बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केला आहे, तो निषेधार्ह आहे. सावरकरांच्या मुद्द्यावरून राजकारण करताना स्वतःच्याच पक्षाचे दैवत असलेल्या बाळासाहेबांचा विसर त्यांना पडला आणि त्यांच्याच हस्ते बाळासाहेबांचा फोटो फाडला गेला. हे केवळ अनवधानाने घडलेले नसून त्यांच्या बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या या नेत्यांना राज्यातील जनता कधीही माफ करणार नाही.
एका बाजूला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि महाविकास आघाडीला घेरण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न होता, मात्र या दुर्दैवी प्रकारामुळे आता शिंदे गटच विरोधकांच्या मुख्य निशाण्यावर आला आहे.
