Headlines

देवगडसमोर बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकची हायस्पीड ट्रॉलर नौका जप्त…

मत्स्यव्यवसाय विभागाची १५ दिवसांत दुसरी मोठी कारवाई;सात खलाशांसह नौका ताब्यात..

⚡मालवण ता.१८-:
महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौकांविरोधात मत्स्यव्यवसाय विभागाने धडक कारवाई सुरूच ठेवली आहे. देवगडसमोरील समुद्रात बेकायदा मासेमारी करणारी कर्नाटकातील मलप्पे बंदराची ‘हनुमा ध्याना’ ही हायस्पीड ट्रॉलर नौका विभागाच्या पथकाने पाठलाग करून जप्त केली. गेल्या १५ दिवसांतील ही दुसरी मोठी कारवाई असून नौकेवरील तांडेलसह सात खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.

१८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाला आचरा समोरील समुद्रात महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात ही नौका विनापरवाना ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. विभागाच्या गस्ती नौकेला पाहताच संबंधित नौकेने वेगाने पळ काढला. मात्र, पथकाने पाठलाग करून देवगडसमोरील समुद्रात तिला पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर नौका देवगड बंदरात आणून जप्त करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारित अधिनियम २०२१ नुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील सुनील शेखर कोट्यान यांच्या मालकीची ही नौका असून तिचा नोंदणी क्रमांक IND- KA- 02- MM-6013 असा आहे.

मालवण आणि देवगड परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर नौकांकडून जाळ्यांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाने बेकायदा मासेमारीविरोधात कारवाई तीव्र केली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनीही या प्रश्नावर कठोर भूमिका घेतल्याने विभागाच्या कारवाईला गती मिळाली आहे.
जिल्हा अंमलबजावणी अधिकारी प्रतिक महाडवाला यांच्या नेतृत्वाखाली ‘शीतल’ गस्ती नौकेद्वारे ही कारवाई करण्यात आली. सागरी सुरक्षा रक्षक दिवाकर जुवाटकर, संतोष टुकरुल, धाकोजी खवले, अल्पेश नेसवनकर आणि स्वप्नील सावजी यांनी मोहिमेत सहभाग घेतला. सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
रात्रीच्या अंधारात अधिक वेगवान नौकेचा पाठलाग करून तिला पकडण्यात विभागाला यश आल्याने स्थानिक मच्छिमारांमधून समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत होणाऱ्या बेकायदा मासेमारीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page